अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

By पंकज पाटील | Published: June 19, 2024 04:32 PM2024-06-19T16:32:42+5:302024-06-19T16:33:22+5:30

अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे.

Shiv Sena's anniversary banner shows factionalism in Ambernath! | अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ :अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेली गटबाजी वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून पुन्हा एकदा समोर आली आहे. या गटबाजीकरून काही दिवसांपूर्वी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून दोन्ही गटांचे कान टोचले होते. मात्र त्यानंतरही काहीही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे.

अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचे उघडपणे प्रदर्शन झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकासकामे करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून गटबाजी समोर आली आहे.

अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ३ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी वरिष्ठांनी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. 

- लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये येणार असल्याची कल्पना असताना देखील बैठकीच्या ठिकाणी शहराध्यक्षांचा फोटो एका गटाने डावळला होता. त्यावरून समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

 - आढावा बैठकीत फोटो वरून वाद निर्माण झालेला असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली होती तसेच पदाधिकाऱ्यांना देखील सज्जड दम देण्यात आला होता.

 - वाळेकर गट आणि आमदार किनीकर गट यांच्यात आता मोठ्या प्रमाणात वाद वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Web Title: Shiv Sena's anniversary banner shows factionalism in Ambernath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.