शिवसेनेचा डोंबिवलीत खांदेपालटाचा धमाका, तोंडाला काळे फासण्याचे प्रकरण भाऊ चौधरींना भोवले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:47 AM2017-10-24T03:47:43+5:302017-10-24T03:47:53+5:30
डोंबिवली : भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी असलेल्या भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासल्याने संतप्त झालेल्या जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील राजेश मोरे यांची नेमणूक केली.
डोंबिवली : भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी असलेल्या भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासल्याने संतप्त झालेल्या जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील राजेश मोरे यांची नेमणूक केली. यातून महापौर राजेंद्र देवळेकर हटाव मोहिमेत सहभागी असलेल्या गटाला पद देत शिंदे यांनी त्यांनाही सांभाळून घेतल्याची शिवसैनिकांची भावना आहे. मोरे हे उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे यांचे समर्थक आहेत आणि म्हात्रे यांचे पुत्र दीपेश हे महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत.
अर्थात मोरे यांच्या पत्रावर मे अखेरची तारीख असल्याने ही नियुक्ती ताजी आहे की तो निर्णय आधीच झाला होता, याची चर्चा रंगली आहे. भाऊ चौधरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक म्हणून जबाबदारी देत त्यांना शहराच्या राजकारणातून दूर केल्याचे मानले जाते. त्यामुळेच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याने पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीनंतर मोरे यांना सभागृह नेतेपद देण्यात आले. नंतर स्थायी समितीचे सदस्यत्व आणि आता शहरप्रमुखपद देण्यात आल्याने एका गटाला झुकते माप देण्यात आल्याची चर्चा शिवसेनेत आहे. देवळेकर यांच्या महापौरपदाची मुदत संपल्यानंतर आपल्याला ते पद मिळावे, यासाठी दीपेश म्हात्रे प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.
पालकमंत्री एकनाथ शिंंदे यांनी कल्याण-डोंबिवलीतील निवडक पदाधिकाºयांना सोमवारी ठाण्यात बोलावून या घोषणा केल्या. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, भाऊ चौधरी यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.
भाऊ चौधरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेची गाढवावरुन प्रतिकात्मक धिंड काढली होती. त्यानंतर भाजपाचे डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष-नगरसेवक महेश पाटील यांनी चौधरींच्या तोंडाला काळे फासल्यामुळे काही काळ शहरात तणाव होता. या घटनेची पालकमंंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली होती. असा शहरप्रमुख आम्हाला नको, अशी जाहीर भूमिका घेण्यापर्यंत तेव्हा शिवसैनिकांची मजल गेल्याने काही काळ गेल्यावर पद बदलून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे मानले जाते. पालिका निवडणुकीत डोंबिवलीत शिवसेनेला फटका बसला. स्वत: चौधरी हेही निवडणुकीत हरले होते. शहरप्रमुखपदावर चौधरी यांना चार वर्षे झाली होती. त्या काळात पक्षाला बळकटी मिळाली नसल्याचा मुद्दा शिंदे यांच्यापर्यंत पोचवण्यात आला होता. डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात भाऊंनी पक्षाचेच महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र दिले होते. त्याचीही पक्षाने दखल घेतली आणि पद बदलण्याची कारवाई करण्यात आली.
>‘रासरंग दांडिया’च्या यशाचे बक्षीस मिळाल्याची चर्चा
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या रासरंग दांडियात गुजराती समाजाला सहभागी करून घेण्यात मोरे यांनी पुढाकार घेतला होता. राज्यमंत्री, भाजपाचे स्थानिक पातळीवरील भरभक्कम नेते रवींद्र चव्हाण यांच्या ‘नमो दांडिया’ उत्सवाला टक्कर देण्यासाठी या दांडियाचा शिवसेनेला उपयोग झाला. शिवसेनेत येण्याआधी मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. कल्याण उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे यांचे ते हे खंदे समर्थक आहेत. १९९७ मध्ये ते शिवसेनेत आले. त्यांनी पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेतर्फे नगरसेवक झाले. यंदा भाजपची लाट असतांनाही संगीतावाडीत काँटे की टक्कर देत मोरे यांनी ८८ मतांनी विजय मिळवला होता.