शिवसेनेच्या सहकार्याचा ‘कोट’ पडणार महागात?
By admin | Published: July 4, 2017 06:36 AM2017-07-04T06:36:17+5:302017-07-04T06:36:17+5:30
स्वत:च्या पक्षाचे सूचक व अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : स्वत:च्या पक्षाचे सूचक व अनुमोदक नसतानाही शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे मनसेच्या सुनंदा कोट यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या नेत्यांना आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या कोट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी दिली. आता यावर कोट काय खुलासा करतात आणि पक्ष त्यावर कोणता निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे.
केडीएमसीच्या १० प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार आहे. या समितीवर महिला उमेदवारांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने दहाही जणींची समित्यांवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार आहे. याची अधिकृत घोषणा बुधवारी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी होईल. मात्र, ‘अ’ प्रभाग समितीवर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रभागात अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी पुरेसे सूचक व अनुमोदक नसताना कोट यांनी शिवसेनेच्या सहकार्याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे गणेश कोट आणि हर्षाली थवील त्यांना यांचे सूचक आणि अनुमोदन लाभले आहे.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोट यांनी त्यांच्या मनसेला अंधारात ठेवले आहे. महापालिकेतील मनसेचे पदाधिकारी असलेले विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि गटनेते भोईर यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. गटनेते भोईर यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे चौकशी केली असता त्यांनाही कोट यांनी कल्पना दिली नसल्याचे समोर आले आहे.
बोलण्यास नकार
अखेर, पक्षाने कोट यांना रितसर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार नोटीस बजावण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. यासंदर्भात कोट यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.