भाजपाविरोधात गुन्ह्याची शिवसेनेची मागणी, मीरा रोडची घटना : उद्यानाचे परस्पर उद्घाटन केल्याने चिघळला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:24 AM2017-10-16T06:24:15+5:302017-10-16T06:24:30+5:30
महापालिकेची परवानगी नसतानाही मीरा रोडच्या शांतीनगरमधील उद्यानाचे सत्ताधारी भाजपाकडून परस्पर उद््घाटन करण्यात आले.
मीरा रोड : महापालिकेची परवानगी नसतानाही मीरा रोडच्या शांतीनगरमधील उद्यानाचे सत्ताधारी भाजपाकडून परस्पर उद््घाटन करण्यात आले. स्थानिक नगरसेविकाही मला डावलण्यात आल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका दिप्ती भट यांनी केल्याने भाजपा-शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहेत.
शांतीनगरच्या सेक्टर पाचमधील सरदार वल्लभभाई पटेल उद्यान व मैदानाचे उद्घाटन रविवारी सकाळी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केले. या वेळी सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थानिक नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरिया व हेतल परमार यांच्यासह भाजपा गटनेते हसमुख गेहलोत, नगरसेवक प्रशांत दळवी, अनिल विराणी, सीमा शाह, माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी आदी उपस्थित होते. या उद्घाटनाची भाजपाची निमंत्रण पत्रिकाही सोशल मीडियावर सर्वांना पाठवण्यात आली होती.
मागच्या पालिका कार्यकाळात प्रभागातील तत्कालीन नगरसेवक अश्विन कासोदरिया व नगरसेविका सीमा शाह यांच्या नगरसेवक निधीतून आणि महापालिका निधीतून हे उद्यान, खुली व्यायामशाळा, जॉगर्स ट्रॅक, खेळणी, मैदान आदी तयार करण्यात आल्याचा दावा भाजपाच्या नगरसेवकांनी केला आहे.
उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका दिप्ती भट यांना दिलेल्या पत्रात मात्र उद्यानातील खेळणी, बसण्याचे बाकडे, व्यायामाचे साहित्य, लॅण्डस्केपिंग आदी खर्च उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या निधीतुन केल्याचे; तर काही खेळणी नगरसेवक अश्विन कासोदरीया यांच्या नगरसेवक निधीतून दिल्याचे स्पष्ट केल्याने भाजपाचे नेते लोकांची फसवणूक व दिशाभूल करत असल्याचा आरोप भट यांनी केला.
भट यांनी १५ सप्टेंबरला पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम यांना पत्र देऊन सेक्टर पाचमधील सरदार पटेल उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी प्रभागातील चारही नगरसेवकांना बोलावण्यात यावे, पक्षपातीपणा करु नये असे कळवले होते. प्रभागात भाजपाचे तीन, तर शिवसेनेचा एक नगरसेवक असल्याने भाजपाकडून परस्पर उद्घाटन करण्याचा प्रकार केला जाण्याची शक्यता भट यांनी वर्तवली होती. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी उद्घाटनाबद्दलचे पत्र बांधकाम विभागास पाठवून दिले होते.
त्यानंतरही भाजपाने १५ आॅक्टोबरला परस्पर उद्घाटनाचा घाट घातल्याचे कळताच भट यांनी शनिवारीच नयानगर पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतरही उद्घाटन झाल्याने आता भट यांनी सबंधितांवर बेकायदा प्रवेश करुन उद्घाटन करणे, नामफलक लावणे, चोरून वीज वापरणे, बेकायदा कार्यक्रम करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
सोमवारच्या महासभेत आयुक्तांनीच उद्घाटने, भूमिपुजन, नामफलक लावणे आदी कामे नगरसेवकांकडून परस्पर केली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे नमूद करत याबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे महासभेकडे लक्ष लागले आहे.
जैन यांचे नामफलक तोडले
या उद्यानाच्या उद्घाटनासाठी आधीच नामफलक तयार केले गेले होते. त्यावर तत्कालीन महापौर गीता जैन यांचे नाव होते. पण ते नामफलक आता तोडून टाकण्यात आल्याचे आढळून आल्याने भाजपाअंतर्गत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.