कल्याणमध्ये शिवसेनेचा ‘घंटानाद’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:33 PM2018-08-22T23:33:01+5:302018-08-22T23:33:52+5:30
देवीच्या दर्शनासाठी शिवसैनिकांची कूच; १00 कार्यकर्ते ताब्यात
कल्याण : बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी हिंदूंना मज्जाव केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने यावर्षीही घंटानाद आंदोलन केले. ईदगाहला लागूनच असलेल्या मंदिरात बुधवारी सकाळी नमाज पठणाच्यावेळी दर्शनासाठी जाऊ पाहणाऱ्या शिवसैनिकांची वाट पोलिसांनी रोखून धरली. यावेळी शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
टिळक चौकात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून श्री गणेशाची आरती म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी मंदिराची वाट धरली. शिवसेनेकडून दरवर्षीच आंदोलन केले जात असल्याने पोलीस आधीच सतर्क होते. त्यामुळे लाल चौकीपासून थोड्या अंतरावर दुर्गाडी चौकाच्या आधीच पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून कार्यकर्त्यांची वाट रोखून धरली. शिवसेनेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी, महापौर विनीता राणे, सभागृह नेते श्रेयस समेळ, पदाधिकारी रवींद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे, गणेश जाधव, कैलास शिंदे, सचिन बासरे, राजेंद्र दीक्षित, अरविंद मोरे आदी महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलनात सहभाग घेतला. जवळपास १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी दोन बसने मानपाडा पोलीस ठाण्यात नेले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी पोलीस ठाण्यास भेट दिली.
कार्यकर्त्यांना दर्शनास मज्जाव केल्याबद्दल पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्यावर शिवसैनिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. नमाजपठणाच्या कालावधीत मंदिरातील घंटा झाकून ठेवली जाते. मंदिरप्रवेशही नाकारला जातो. त्याची पूर्वसूचना पोलिसांकडून काढली जाते का? त्याची पूर्वप्रसिद्धी वर्तमानपत्रांतून केली जाते का, असे सवाल साळवी यांनी केले. उपायुक्त त्यावर काहीही बोलू शकले नाही.
दुर्गाडीदेवीच्या मंदिराला लागून ईदगाहची जागा आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम आणि हिंदूंमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर प्रवेश बंद केला जातो. १९८६ साली शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरू केले.