इच्छुकांमुळे परिवहन निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:37 PM2020-02-24T23:37:02+5:302020-02-24T23:37:16+5:30
४ मार्च रोजी निवडणूक : १२ सदस्य निवडले जाणार; महाविकास आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाढली अपेक्षा
ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली परिवहन समितीची निवडणूक ४ मार्च रोजी होत आहे. त्यासाठी सोमवारी शिवसेनेकडून सात, राष्ट्रवादीकडून ४, भाजप २ आणि काँग्रेसच्या एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केले. वास्तविक १२ सदस्य हे परिवहन समितीत निवडून जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एकाला सदस्याला शिवसेनेला निवडणूक द्यावे लागणार आहे. त्यातच स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेससोबत असल्याने शिवसेनेला आपला एक उमेदवार मागे घ्यावा लागणार असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
दोन वर्षांपूर्वी परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ सुंपष्टात आला होता. त्यानंतर पक्षीय बलानुसार परिवहन समिती हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शिवसेनेने परिवहनची निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता दोन वर्षांनंतर शिल्लक राहिलेल्या ६ सदस्यांचा कार्यकाळही येत्या ३१ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणूक घेण्यात येत आहे.
पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य परिवहनमध्ये जाणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिवसेनेकडून प्रथमच पक्षाने सर्वात जुन्या आणि निष्ठावान असलेल्या विलास जोशी यांना संधी दिली आहे. यापूर्वी महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत एबी फॉर्म, उमेदवारी अर्ज देण्याचे काम त्यांच्या खांद्यावर असे. याशिवाय अरुण पाटील, प्रकाश कोटवानी, पुजा वाघ, रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे, बालाजी काकडे आणि राजेंद्र महाडिक यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर राष्टÑवादीकडून तीन सदस्य जाणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसीन शेख आणि नितीन पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून राम भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे.
राज्यात महाविकास आघाडी असल्याने परिवहनमध्ये संधी मिळावी, अशी अपेक्षा काँग्रेसची आहे. दुसरीकडे राष्टÑवादीनेदेखील अधिकचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. स्थायीची परतफेड करण्यासाठी काँग्रेसला साथ देणे शिवसेनेला क्रमप्राप्त झाले आहे. दुसरीकडे राष्टÑवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन भाजपला रोखण्यासाठी शिवसेना परिवहनमध्ये प्रयत्न करणार आहे. त्यानुसार भाजपने दोन अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेचे मत आपल्या उमेदवाराबरोबर राष्टÑवादीच्या उमेदवाराला मिळाले तर भाजपचा एकच सदस्य परिवहनमध्ये जाण्याची शक्यता आहे. ही सर्व समीकरणे जुळून येत असली तरी महाविकास आघाडीमुळे शिवसेनेपुढील डोकेदुखी वाढली आहे.