बदलापुरात पुन्हा शिवसेनेच्या पक्षबांधणीला सुरूवात. संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीतीतील नियोजन
By पंकज पाटील | Published: August 9, 2022 07:26 PM2022-08-09T19:26:28+5:302022-08-09T19:27:15+5:30
Shiv Sena: बदलापूरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
- पंकज पाटील
बदलापूर: बदलापूरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा बदलापुरात शिवसेना पक्षबांधणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
नुकतेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांनी बदलापुरात किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी बदलापुरात पुन्हा शिवसेना बळकट करण्याच्या दृष्टीने कशाप्रकारे पक्षबांधणी करावी लागेल, काही कारणास्तव मुख्य प्रवाहातून बाजूला गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, ज्या पदाधिकाऱ्यांना वा माजी नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत यायची इच्छा असेल त्यांच्याशी कशाप्रकारे संपर्क साधायचा आदी विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. बदलापूरातील काही माजी नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून रुपेश म्हात्रे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे योग्य नियोजन करून पक्षबांधणी केली जाणार असून त्यामुळे निश्चितच बदलापुरात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वासही किशोर पाटील यांनी व्यक्त केला.
चार दिवसांपूर्वीच बदलापूरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पातकर, माजी उपनगराध्यक्ष प्रिया गवळी, उपशहर प्रमुख प्रशांत पालांडे, गिरीश राणे , नरेश मेहेर , संतोष शिंदे ,विलास हंकारे, श्याम शिंदे, रामलू डोरापल्ली, लक्ष्मीकांत कौसुंदर, बाळकृष्ण पाटील, कुणाल साळवे, धनंजय पावसकर, तेजस गंद्रे, आदींसह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपली निष्ठा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व मातोश्री सोबत आहे आणि राहील, असे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे आगामी काळात पक्ष बांधणीत व शिवसंवाद यात्रेला बदलापुरात पूर्वीचाच जोश व उत्साह दिसून येईल,अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे लवकरच बदलापुरात शिवसेना पक्षबांधणीच्या हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत असून आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.