भिवंडी पालिकेतील भ्रष्टाचार समस्यांबाबत शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन
By नितीन पंडित | Published: February 2, 2023 04:42 PM2023-02-02T16:42:47+5:302023-02-02T16:43:30+5:30
येत्या आठवड्यात या बाबत उपाययोजना न केल्यास पालिका प्रशासना विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिला.
भिवंडी : भिवंडी शहरातील विविध समस्यांबाबत पत्रव्यवहार करून सुद्धा त्या सोडवणुकीसाठी पालिका प्रशासन निरुत्साही असल्याने शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्तांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
भिवंडी महानगरपालिकेच्या करमुल्यांकन विभागाच्या संगणकातून २७ लाख रुपयांची नोंद गायब करुन भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती कामाला तात्काळ सुरवात करावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन आश्वारुढ पुतळा उभारणीच्या कामास होणारी दिरंगाई, काप आळी येथे स्व.आप्पासाहेब पड्याळ चौक उभारण्यास होत असलेली टाळाटाळ, शहरातील नादुरुस्त रस्ते अशा विविध समस्यांवर आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांना निवेदन दिले.
तसेच, येत्या आठवड्यात या बाबत उपाययोजना न केल्यास पालिका प्रशासना विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी दिला. या शिष्टमंडळात शिवसेनेचे शहर सचिव महेंद्र कुंभारे, शहर समन्वयक नाना झळके, विधानसभा सचिव गोकुळ कदम, उपशहरप्रमुख राकेश मोरे, निलेश केकाण, भाई वनगे, मनोज पाटील, विभागप्रमुख गजेंद्र गुळवी, संतोष भावार्थे, शाखाप्रमुख भाऊ काठवले, आकाश देवकर, स्वप्निल जोशी, अर्जुन साळुंखे इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होते.