बुलेट ट्रेनच्या मुद्यावर शिवसेनेची तलवार म्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:49+5:302021-08-13T04:45:49+5:30
ठाणे : बुलेट ट्रेनच्या जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव चारवेळा फेटाळल्यानंतरही पुन्हा हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आला आहे. यावेळी हा ...
ठाणे : बुलेट ट्रेनच्या जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव चारवेळा फेटाळल्यानंतरही पुन्हा हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आला आहे. यावेळी हा प्रस्ताव मंजूर होणार असल्याची माहिती सत्ताधारी शिवसेनेकडूनच देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा तसेच पालिकेलादेखील मोबदला मिळावा या हेतूने हा प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु प्रत्यक्षात केंद्राकडून राबविण्यात येत असलेल्या मोठ्या प्रकल्पांबाबत केंद्राने निधी देण्यात हात आखडता घेतल्याने त्याचा फटका शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्यता असल्यानेच हा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
मुंबई कारशेडच्या जागेवरून राज्य आणि केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी तणाव वाढला होता. त्यामुळे ठाण्याची सत्ता हाती असलेल्या शिवसेनेकडून केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला जागा हस्तांतरण करण्यास विरोध होणार, हे निश्चित होते. ते खरेही झाले. चारवेळा बुलेट ट्रेनसाठी जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव महासभेने फेटाळून लावला होता. मात्र आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी मांडण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाची आग्रही भूमिका आहे. ठाणे महापालिका हद्दीत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. काही प्रकल्पांच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. यातील बहुतेक प्रकल्प हे केंद्राच्या निधीवर अवलंबून आहेत. केंद्राकडून यासाठी यापूर्वी ५० टक्क्यांपेक्षा जास्त निधी महापालिकेला प्राप्त झालेला आहे. मात्र जर केंद्राच्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध झाल्यास पालिकेच्या प्रकल्पांसाठी तसेच विकासकामांसाठी केंद्राकडून येणाऱ्या निधीची अडवणूक होण्याची धास्ती प्रशासनाला आणि शिवसेनेलादेखील आहे. कोरोना काळात हे प्रशासनाला किंबहुना सत्ताधाऱ्यांनादेखील परवडणारे नाही. याशिवाय जागा हस्तांतरण प्रस्तावाला विरोध केल्याने शेतकऱ्यांकडूनही शिवसेनेकडे नाराजी व्यक्त होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा आणि पालिकेलादेखील त्यांच्या जागेचा मोबदला मिळावा, या हेतूनेच हा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतल्यास त्याचा परिणाम आगामी महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेला बसू शकतो अशी भीतीदेखील शिवसेनेला वाटू लागली आहे. त्यातही बहुतांश जागेचे अधिग्रहण झाल्याने शिवसेना हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात शिवसेनेतील एका वरिष्ठ नगरसेवकाशी चर्चा केली असता, त्यांनीदेखील हा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यातूनच कदाचित मुंबई मेट्रोच्या कारशेडचा प्रश्नदेखील मार्गी लागण्याची आशा शिवसेनेला यानिमित्ताने वाटू लागली आहे.
मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो. ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींसाठी प्रतिहेक्टर ९ कोटी रुपये मोबदला निश्चित करण्यात आला आहे. या प्रकल्पात महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील ३,८४९ चौरस मीटर जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने गेल्यावर्षी केली होती. या जागेच्या बदल्यात ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार मोबदला घेऊन ही जागा एनएचएसआरसीएलच्या नावे करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वर्षभरापूर्वी तयार केला आहे.
.............
तणाव मावळणार
कारशेडच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध ताणले गेले होते. त्यामुळेच बुलेट ट्रेनला जागा हस्तांतरण करण्यास ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून विरोध करण्यात आला होता. मात्र आता राज्यस्तरावरील नेत्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या सूचना केल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनामध्ये निर्माण झालेला तणाव मावळण्याची चिन्हे आहेत.
...............