मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे ६० प्लसचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:47 PM2022-03-08T22:47:58+5:302022-03-08T22:48:34+5:30
Mira-Bhayander Municipal Corporation Election : मीरा भाईंदर शिवसेनेने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ६० प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे . भगवा सप्ताहच्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम सुरु केली जाणार आहे .
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे ६० प्लसचे लक्ष्य
मीरारोड - मीरा भाईंदर शिवसेनेने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ६० प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे . भगवा सप्ताहच्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम सुरु केली जाणार आहे . आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन सह सेनेचे नगरसेवक , पदाधिकारी उपस्थित होते.
मीरा भाईंदर महापालिका निवडणूक तोंडावर आली असून ऑगस्ट मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपणार आहे . ३ सदस्य प्रभाग पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीत ९५ वरून जागा वाढून आता ११६ जागा असणार आहेत . मीरा भाईंदर शिवसेनेतील दोन नगरसेविका अनिता पाटील आणि दीप्ती भट यांनी भाजपाशी घरोबा केल्याने सेने कडे सध्या १९ नगरसेवक आहेत.
शहर शिवसेनेची सर्व सूत्रे आ. सरनाईक यांच्या हाती असली तरी मागील निवडणुकीत काही चुकलेले तिकीट वाटप , पदाधिकारी नियुक्तीचे वाद आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या त्यावेळच्या मतदार संघात केलेले दुर्लक्ष आदी अनेक कारणांनी सेनेला २०१७ च्या पालिका निवडणुकीत फटका बसला होता. शिवाय सेनेतील काही पदाधिकारी-नगरसेवकांची निष्क्रियता व अंतर्गत वाद सुद्धा कारणीभूत ठरत आहेत .
मीरा भाईंदर मतदार संघात आता अपक्ष आमदार गीता जैन ह्या शिवसेनेच्या बाजूने असल्या तरी आ . जैन व आ. सरनाईक यांच्यातील मतभेद , खा . विचारे व आ. जैन यांच्यात सामंजस्य असले तरी आ. सरनाईक नसल्याने नगरसेवक व पदाधिकारी यांची होणारी कोंडी चर्चेचा विषय ठरले आहेत.
परंतु रविवारी रात्री आ . सरनाईक यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत खा . विचारें सह आ . गीता जैन सुद्धा उपस्थित होत्या. त्यामुळे उपस्थित नगरसेवक व पदाधिकारी यांनी देखील काहीसा सुटकेचा निश्वास टाकला असल्याचे सांगितले जाते . आ. जैन यांनी तर ९० प्लस का नको ? असे सांगत बैठकीत जोश भरला . आ . सरनाईक यांनी देखील सर्वानी एकजुटीने - एकदिलाने कामाला लागा असे आवाहन केले . यावेळी खासदार व दोन्ही मदारांनी पालिकेवर भगवा फडकवण्याचा संकल्प जाहीर केला .