अंबरनाथच्या शिवमंदिराला धाेका; पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:18 AM2022-03-25T10:18:43+5:302022-03-25T10:21:30+5:30
प्राचीन वारसा असलेल्या मंदिराचे अस्तित्व धोक्यात
अंबरनाथ : शहरातील प्राचीन शिवमंदिराची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. हे मंदिर तब्बल ९६२ वर्षे जुने असून, शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे या मंदिराचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना समजले जाते. १०६० मध्ये शिलाहार राजा मम्बवाणी यांनी या शिवमंदिराची निर्मिती केली होती. आता त्याची पडझड व्हायला सुरुवात झाली आहे. कारण ज्या पुरातत्व खात्याकडे या मंदिराची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून हा वारसा जतन करण्यासाठी काहीही उपायोजना केल्या जात नाहीत. प्राचीन मंदिराच्या आवारात १५ वर्षांपूर्वी दगडी फरशा बसवल्या होत्या. त्यावेळी मंदिराला काही ठिकाणी तडे आणि भेगा पडल्याचे निदर्शनास आल्याने पुरातत्व खात्याने तडे बुजविले होते. मात्र, त्यानंतर मंदिराच्या डागडुजीकडे पुरातत्व खात्याने लक्षच दिलेले नसल्याची मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांचा आरोप आहे.
या मंदिराची डागडुजी आणि देखभाल दुरुस्ती आम्ही करायला तयार आहोत, मात्र पुरातत्व खात्याच्या जाचक अटींमुळे मंदिराला साधा हळदीचा टिक्काही लावता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महाशिवरात्र तसेच अन्य दिवशीही भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात.
पुरातत्त्व विभागाचा नाकर्तेपणा
भग्नावस्थेतील मूर्तीची दुरुस्तीची जबाबदारी ही केवळ पुरातत्त्व विभागाची आहे. मात्र, दुरुस्तीसाठी अद्याप कोणताही प्रयत्न केलेला नाही.
नगरपालिकेने शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्या प्रकल्पात मंदिराच्या दुरुस्तीचा विषय येण्याची गरज आहे.
शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी होतो. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही कामाची संधी आयोजकांना मिळत नाही.
निधीची ओरड असल्याने त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, नेमके काम काय करावे, याबाबत पुरातत्व विभाग योग्य माहिती देत नाही.
मंदिराच्या शेजारून सांडपाणी वाहत असल्याने ते वाहून नेण्यासाठी भुयारी मार्गाची गरज आहे. मात्र, परवानगीअभावी परिसराचा विकास रखडला आहे.
दुर्मीळ मूर्तींचा समावेश
अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराला तीन दरवाजे असून, मंदिराच्या बाहेरच्या भागावर सर्व बाजूंनी देवदेवतांच्या सुबक मूर्ती दगडात कोरलेल्या आहेत.
यामध्ये अनेक दुर्मीळ मूर्तींचाही समावेश आहे.
मात्र, या सगळ्या मूर्तींची झीज होत चालली असून, काही मूर्ती भग्नावस्थेत आहेत.
त्यामुळे या सगळ्यांचे पुढच्या पिढीसाठी जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र संबंधित विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.