अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर भाविकांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:42 PM2021-08-09T17:42:56+5:302021-08-09T17:47:13+5:30
Shiva temple of Ambernath : गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याकारणाने श्रावणात मंदिर बंद ठेवण्यात आले होते त्यानंतर आता या वर्षी देखील श्रावणी सोमवार निमित्त मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबरनाथ - अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात आज श्रावणी सोमवार निमित्त भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली होती. मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारावरूनच भाविकांना माघारी परतावे लागले. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. प्राचीन शिव मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याकारणाने श्रावणात मंदिर बंद ठेवण्यात आले होते त्यानंतर आता या वर्षी देखील श्रावणी सोमवार निमित्त मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी अनेक शिवभक्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन तेथेच दर्शन घेत माघारी फिरकले. कोणत्याही भाविकांना मंदिराच्या परिसरात प्रवेश देण्यात आला नाही. या ठिकाणी चौक पोलrस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
मंदिर उघडण्यास संदर्भात राज्य शासनाचे कोणतेही निर्देश लागू न झाल्याने हे मंदिर बंद असून शासनाच्या निर्णयानंतरच हे मंदिर उघडण्यात येणार असल्याचे पारंपारिक पुजाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. श्रावणातील पहिला सोमवार असल्याने मंदिराच्या गाभार्यात पारंपारिक पुजारी असलेल्या पाटील कुटुंबीयांनी विधीवत पूजा करून मंदिर बंद केले. मंदिर बंद असल्याने भाविकांची संख्या देखील या ठिकाणी कमी होती भाविकच नसल्याकारणाने मंदिर परिसरातील हार आणि फुल विक्री करणाऱ्यांना देखील त्याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे श्रावणात खऱ्या अर्थाने हार फुलांचा व्यवसाय चालतो मात्र मंदिर बंद असल्या कारणाने त्याचा सर्वात मोठा फटका बसल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या यापार्यांनी दिली आहे. अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिरात भाविकांसाठी बंद असले तरी इतर लहान मंदिरांमध्ये मात्र भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.