महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक रोषणाईने शिव मंदिरे सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:29 AM2019-03-04T00:29:57+5:302019-03-04T00:30:00+5:30

प्राचीन खिडकाळेश्वर आणि पिंपळेश्वर मंदिरांसह डोंबिवली परिसरातील शिव मंदिरे सोमवारी असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त सजली आहेत.

Shiva temples were decorated with great fervor for Mahashivaratri | महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक रोषणाईने शिव मंदिरे सजली

महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक रोषणाईने शिव मंदिरे सजली

Next

डोंबिवली : प्राचीन खिडकाळेश्वर आणि पिंपळेश्वर मंदिरांसह डोंबिवली परिसरातील शिव मंदिरे सोमवारी असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त सजली आहेत. खिडकाळेश्वर मंदिराला रंगरंगोटीबरोबरच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारांजवळ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंडप घालण्यात आला आहे. दुधाचा अभिषेक न करता फुले वाहण्याचे आवाहन खिडकाळेश्वर मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करण्याची पारंपरिक पद्धत आहे; मात्र सहा वर्षांपासून खिडकाळेश्वर मंदिरात पर्यावरणरक्षणाच्या भावनेतून केवळ फुलांचा अभिषेक घालण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवलीच्या पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंतीबांधणीचे तेराव्या शतकातील हे स्वयंभू शिव मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे सुमारे दोन लाख भाविक दर्शनासाठी येतात.
शिस्तबद्ध दर्शनरांगा, चप्पल ठेवण्याची व्यवस्था, गाभारादर्शन, मोफत पाणी, चहा, खिचडी यांची चोख व्यवस्था करण्यात येते. जत्रा व त्यातील विक्रेते व मनोरंजनासंबंधीही नियोजन केले जाते. यासाठी ट्रस्टचे २०० कार्यकर्ते तीन दिवस झटत असतात. शिवरात्री उत्सवाआधी व नंतर खिडकाळी ग्रामस्थ व महिला मंडळातर्फे संपूर्ण मंदिर परिसराची साफसफाई व स्वच्छता केली जाते.
स्वामी शिवानंद महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेले सागाव ग्रामीण विभागातील पिंपळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी केली आहे. भक्तांना दर्शन घेताना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे पिंपळेश्वर महादेव मंदिर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.
पिंपळेश्वर मंदिरात सोमवार आणि मंगळवार असा दोन दिवस महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. मुख्य व्यासपीठावर मंगळवारी सकाळी ८.३० ते रात्री ९.३० पर्यंत संगीत भजन होणार आहे. सोमवार सकाळी १० पासून मंगळवार सकाळी १० वाजेपर्यंत अखंड श्रीराम जयराम, जयजय राम हा मंत्रजप होणार आहे. सोमवारी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा परिषदेच्या सहकार्याने नेत्रतपासणी आणि चष्मेवाटप करण्यात येणार आहे. ५ मार्चला सकाळी १० वाजता सत्यनारायण पूजा आणि सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ७ ते ९ कीर्तन तसेच सायंकाळी ६ ते १० या वेळेत महाप्रसाद होणार आहे.
>शिव मंदिरांत विविध कार्यक्रम : डोंबिवली शहर परिसरात व ग्रामीण भागात अनेक महादेवाची मंदिरे आहेत. त्यामधील काही मंदिरांना शिवकालीन वारसा आहे. डोंबिवली शहरातील रामनगरमधील शिव मंदिर, मानपाडा रोडवरील पिंपळेश्वर मंदिर, डोंबिवली पश्चिमेला कोपर गावातील नागेश्वर मंदिर, जुन्या डोंबिवली येथील शिव मंदिर आदी मंदिरांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी जत्रेचे स्वरूप असते. सर्व मंदिरांत पहाटेपासून पूजाअर्चा, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होणार आहेत.

Web Title: Shiva temples were decorated with great fervor for Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.