ठाण्यातील शिवाई विद्यालय : ‘लर्न विथ नेचर’चा विद्यार्थ्यांना लळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:56 AM2018-07-08T03:56:16+5:302018-07-08T03:56:48+5:30
पहिलीपासूनच इंग्रजीचे धडे देणे, शैक्षणिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन याचबरोबर लर्न विथ नेचरसारखे विविध उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील शिवाई विद्यालयाच्या पटसंख्येबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सातत्याने उंचावतो आहे.
- स्नेहा पावसकर
ठाणे : पहिलीपासूनच इंग्रजीचे धडे देणे, शैक्षणिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन याचबरोबर लर्न विथ नेचरसारखे विविध उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील शिवाई विद्यालयाच्या पटसंख्येबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा सातत्याने उंचावतो आहे.
शिवाईनगर परिसरातील शिवाई विद्यालयाची स्थापना सन १९९६ मध्ये सुधाकर चव्हाण यांनी केली. शाळेत शिशुपासून ते दहावी इयत्तेपर्यंतचे वर्ग आहेत. तर, इंग्रजी भाषा बोलणे, लिहिणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून शाळेत पहिली इयत्तेपासूनच सेमी इंग्रजीमधून शिकवले जाते. गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिकवले जातात. यासाठी विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती केली जात नाही. उलट, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अंदाज घेऊन त्यांना सेमी इंग्रजीत प्रवेश दिला जातो. शाळेत मुलांसाठी ई-ग्रंथालय असून त्यांच्या इयत्तेनुसार त्यांना पुस्तके उपलब्ध केलेली आहेत. तसेच ग्रंथालयात अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या लेखक, साहित्यिकांचे कॅरिकेचर करून त्यांची माहिती असलेले पोस्टर शाळेच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. वर्गातील तसेच शाळेच्या आवारातील भिंतींवर या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून चित्रे काढण्यात आली असून भिंती बोलक्या आहेत. विज्ञान प्रयोगशाळेप्रमाणेच गणिताची प्रयोगशाळा आहे. या माध्यमातून गणित सोपे करून सांगितले जाते. जवळच्या आदिवासीपाडे, गावातील काही मुले पाचवी किंवा आठवी इयत्तेपासून शिवाई विद्यालयात प्रवेश घेतात. अशा मुलांना खाजगी शिकवणीची फी परवडत नाही. मात्र, त्या मुलांनाही उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशाने शाळेतर्फे त्यांचे मोफत शिकवणीवर्ग घेतले जातात. शाळा सुटल्यावर किंवा भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली जाते.
स्कॉलरशिप, प्रज्ञा शोध परीक्षा यासारख्या परीक्षांना बसण्याची संधी देऊन विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. शाळेच्या वतीने लर्न विथ नेचर हा आगळावेगळा उपक्रम आयोजिला जातो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना भोवतालच्या जगाचेही ज्ञान व्हावे, या उद्देशाने त्यांना येऊर येथे नेले जाते. तिथे शेती, निसर्गात होणारे बदल, पक्षी, फुले, लोकजीवन यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.
संस्थापकीय अध्यक्ष सुधाकर चव्हाण, अध्यक्ष विलास सूर्यवंशी आणि संस्था शाळेत नवनवीन प्रयोग राबवण्यासाठी आग्रही असतात, अशी माहिती शिवाई विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रचना वेखंडे यांनी दिली.
अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड आर्थिक समस्या येत असल्यास त्यावर तोडगा काढला जातो, असे वेखंडे यांनी सांगितले.