शिवाजी चौक अपघात प्रकरण : आमदार, अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:03 AM2018-07-09T03:03:22+5:302018-07-09T03:03:53+5:30
पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला.
कल्याण - पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला. दरम्यान, दोन बळी गेल्यानंतर पदाधिकारी आणि अधिका-यांना जाग आली असून रविवारी आ. नरेंद्र पवार यांच्यासह सेनेच्या पदाधिका-यांनी अपघात घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसी आणि केडीएमसीचे अधिकारीही उपस्थित होते. अपघाताला अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचे आ. पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर पालिकेने येथे रस्त्याचे काम सुरू केले आहे.
या अपघातात रस्तेबांधणीतले दोष चव्हाट्यावर आले असून रस्ते तयार करताना पेव्हरब्लॉकचा वारेमाप वापर होत असल्याचे समोर आले आहे. पेव्हरब्लॉकमुळे सिमेंट असो अथवा डांबरी रस्त्याची पातळी समान राहत नाही. यामधील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरतात. हीच रस्त्याची स्थिती आरोहच्या आणि मनीषा यांच्या जीवावर बेतली असून अशा समान पातळी नसलेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधूनही संबंधित यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
दरम्यान, मनीषा भोईर यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रविवारी दुपारी कल्याण पश्चिमचे आ. नरेंद्र पवार यांनी अपघात झालेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे अधिकारी लोकेश कानतोडे आणि महापालिका अधिकारीही उपस्थित होते. पवार यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी सचिन बासरे, रवींद्र कपोते यांच्यासह स्थानिक नगरसेवक अरुणी गीध या पाहणीदरम्यान पवार यांच्यासोबत होते. तेथेच दोघांचा मृत्यू झाल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. आरोहच्या मृत्यूनंतर पवार यांनी महापालिका, एमएसआरडीसीच्या अधिकाºयांकडे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाºयांनी तेथे दुर्लक्ष केल्याने पुन्हा त्याच ठिकाणी अपघात होऊन महिलेला जीव गमवावा लागला. यामुळे संतप्त पवार यांनी याप्रकरणी महापालिकेचे शहर अभियंता आणि एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, रस्त्याची पाहणी सुरू असताना शिवसेनेचे रवींद्र कपोते यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी कानतोडे यांची कॉलर पकडून त्यांना सुनावल्याचा प्रकार घडला.
आज निषेध आंदोलन
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाती बळी पडलेल्या व्यक्तींना उद्या, सोमवारी शिवाजी चौकात अपघात घडलेल्या ठिकाणी जागरूक नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. दुपारी १२ वाजता ‘सेवासुविधा नाही, तर करही नाही’ या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला जाणार असल्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे आजवर अनेक निष्पाप महिला, दुचाकीस्वार, विद्यार्थी यांना प्राण गमवावे लागले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असल्याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन देणार असून यावेळी शहर पोलीस आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी उपस्थित राहावे, ज्यायोगे कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, असेही घाणेकर यांनी सांगितले. कल्याण-आग्रा रोड मृत्यूचा अड्डा बनला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन निष्पाप जीव गेले. याप्रकरणी संबंधित अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन कल्याणमधील आपच्या वतीने एमएफसी पोलिसांना देण्यात आले.