ठामपातल्या शिवाजी महाराजांच्या शिल्प दुरुस्तीवरून महापौरांच्या दालनात राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:21 PM2019-08-20T18:21:57+5:302019-08-20T18:22:22+5:30

ठाणे पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या चित्रशिल्पाच्या दुरुस्तीच्या मुद्यावरून मंगळवारी महापौरांच्या दालनात भलताच राडा झाला.

Shivaji Maharaj's craft repairs in the mayor's hall | ठामपातल्या शिवाजी महाराजांच्या शिल्प दुरुस्तीवरून महापौरांच्या दालनात राडा 

ठामपातल्या शिवाजी महाराजांच्या शिल्प दुरुस्तीवरून महापौरांच्या दालनात राडा 

Next

ठाणे  - ठाणे पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या चित्रशिल्पाच्या दुरुस्तीच्या मुद्यावरून मंगळवारी महापौरांच्या दालनात भलताच राडा झाला. चित्रशिल्पाच्या दुरुस्तीसाठी निवेदन घेऊन आलेल्या मराठा समाजाच्या पदाधिका-यांमध्ये आणि महापौरांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तीन वर्षं दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही शिल्पाची दुरुस्ती होत नसल्याने निधी गोळा करून मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी या निधीचा चेक तसेच चिल्लर महापौरांना देऊ केल्याने सभागृह नेते आणि महापौर कमालीचे संतप्त झाले.

शिल्पाची दुरुस्ती ही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे झाली असून, हिंमत असेल तर ही चिल्लर आयुक्तांना देऊन दाखवा, असे आव्हान सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मराठा समाजाच्या पदाधिका-यांना केले. हा वाद इतका टोकाला गेला की प्रकरण हमरीतुमरीवर आले. अखेर रागाच्या भरात सखल मराठा समाजाचे समन्वयक कैलाश म्हापदी यांनी आणलेला धनादेश महापौरांच्या दालनामध्येच फाडून टाकत सर्व मंडळींनी थेट आयुक्तांकडे धाव घेतली. 

ठाणे महापालिका मुख्यालयात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबाराच्या शिल्पाची दुरुस्ती व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सकल मराठा समाज यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावरूनसुद्धा काहीच हालचाली झाल्या नसल्याने अखेर सकल मराठा समाजाच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यासाठी महापौर दालनात समाजाचे पदाधिकारी आले होते. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के देखील महापौरांच्या दालनात हजर होते. मात्र समाजाच्या पदाधिका-यांनी 21 हजारांच्या धनादेशाबरोबर काही चिल्लर महापौरांना देण्यासाठी आणल्याची कुणकुण महापौर आणि म्हस्के यांना लागली.  त्यामुळे वादाला खरी सुरुवात झाली. दिरंगाई प्रशासनामुळे झाली असून, हिंमत असेल तर आयुक्तांकडे जाऊन दाखवा, असे आव्हान म्हस्के यांनी केले. तर माझ्या दालनात असे स्टंट करू नका, असे खडे बोलच महापौरांनी सुनावल्याने वातावरण अधिकच तापले. अखेर समन्वयक कैलास म्हापदी यांनी धनादेश दालनामध्येच फाडल्याने नरेश म्हस्के आणि कैलाश म्हापदी यांच्यात चांगलीच चकमक उडाली. महापौरांच्या दालनामध्ये हा संपूर्ण राडा झाल्यानंतर मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी आयुक्तांकडे जाऊन हे निवेदन दिले. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील दोन दिवसांत शिल्पाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. 
--------------
अशा प्रकारे स्टंटबाजी करणे योग्य नाही  
अशा प्रकारे कार्यालयात येऊन स्टंटबाजी करणे योग्य नव्हते. शिल्पाच्या दुरुस्तीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. तसे आदेशाही प्रशासनाला दिले होते. मात्र प्रशासनाकडून ही दिरंगाई झाली आहे. अशा प्रकारे महिला महापौरांच्या दालनात चिल्लर देणे योग्य नाही. 
 - मीनाक्षी शिंदे , महापौर, ठा.म.पा 
--------------------------
मराठा समाजाची ताकद निवडणुकीत दाखवून देऊ 
महापौर हा जवळचा पालक असतो. गेली तीन वर्ष दुरुस्तीची मागणी करत आहोत. जर या शिल्पाचे उद्या काय  झाले तर मोठा वादंग निर्माण होऊ शकतो. हे सांगायला आम्ही गेलो होतो. निवेदन द्यायला आलेल्यांवर अंगावर धावून जाणे सभागृह नेत्यांची ही भूमिका योग्य नाही. आम्ही चिल्लर देणार नव्हतो तर चेक देणार होतो. अशी वर्गणी जमा केली, कारण शिल्पाच्या दुरुस्तीकडे महापालिकेकडे पैसे नाहीत. मात्र आता मत मागताना राजकर्ते दारावर आले तर त्यांना मराठा समाजाची काय ताकद आहे ते निवडणुकीमध्ये दाखवून देऊ .
 कैलास म्हापदी, समन्वयक, सकल मराठा समाज , ठाणे
--------------
या शिल्पाच्या दुरुस्तीसाठी आम्ही देखील पाठपुरावा करत आहोत. केवळ अधिका-यांच्या मतभेदामुळे दुरुस्तीची निविदा निघू शकली नाही. मात्र अशा प्रकारे महिला महापौरांना चिल्लर देणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीत बसत नाही. मीसुद्धा मराठा आहे, मात्र अशी वर्तणूक मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी करणे योग्य नाही. 
 - नरेश म्हस्के , सभागृह नेते, ठा.म. पा  
--------------

दोन दिवसांत काम सुरू करण्यात येईल 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी 10 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात येईल. येत्या दोन ते तीन दिवसात या शिल्पाचे काम सुरू करण्यात येईल. 
- संजीव जयस्वाल, आयुक्त, ठा.म. पा

Web Title: Shivaji Maharaj's craft repairs in the mayor's hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे