भोईर कंपनीला त्यांच्याच वॉर्डात घेरण्याची शिवसैनिकांची रणनीती
By admin | Published: January 28, 2017 02:44 AM2017-01-28T02:44:32+5:302017-01-28T02:44:32+5:30
राष्ट्रवादीमध्ये मागील कित्येक वर्षे असलेल्या बाळकुमच्या भोईर अॅण्ड कंपनीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, त्यांच्या प्रवेशाला
ठाणे : राष्ट्रवादीमध्ये मागील कित्येक वर्षे असलेल्या बाळकुमच्या भोईर अॅण्ड कंपनीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, त्यांच्या प्रवेशाला अद्यापही काही शिवसैनिकांनी आपलेसे केले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेतील शारदा पाटील, लॉरेन्स डिसोझा, निलेश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. एकूणच आता प्रभाग क्र. ८ मध्ये भाजपात गेलेल्या शिवसेनेच्या निष्ठावंतांची लढाई शिवसेनेत आलेल्या उपऱ्या शिवसैनिकांशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच प्रभाग ८ चे चित्र आतापासूनच रंगतदार झाल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये इनकमिंगचे वारे वाहू लागले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर या चार दिग्गजांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने आपला पत्ता कट होणार, हे निश्चित झाल्याने सुरुवातीला शारदा पाटील या शिवसेना नगरसेविकेने निलेश पाटील यांच्यासह गुरुवारी रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आता या प्रभागात रंगतदार लढाई पाहावयास मिळणार आहे. युती तुटल्याने या प्रभागात खरा सामना उपरा शिवसैनिक विरुद्ध निष्ठावान शिवसैनिक असाच रंगणार आहे. त्यामुळे आतापासूनच या रंगतदार लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवकपद जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द झाले होते. किंबहुना, देवराम भोईर यांनी याविरोधात चार वर्षे लढा दिला होता. त्यानंतर, डिसोझा यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. परंतु, आता त्याच डिसोझा यांनी भाजपात प्रवेश करून भोईर अॅण्ड कंपनीला कडवे आव्हान देण्याचे ठरवले आहे. असे असले तरी त्यांचे जातप्रमाणपत्र पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने आडवे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे भाजपाने डिसोझा यांना घेतले असले, तरी त्यांना उमेदवारी द्यायची की नाही, याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे.