मांगरुळमधील झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक, वनाधिकाऱ्यांवर फेकली राख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:32 PM2018-11-19T12:32:45+5:302018-11-19T15:55:09+5:30
अंबरनाथ येथील मांगरूळ जागेवरील झाडांना आग लावण्याच्या प्रकारची चौकशी करावी यासाठी सेनेचा धडक मोर्चा काढत ठाण्यातील कोपरी भागातील वनवृत्त अधिकाऱ्यांच्या अंगावर जळलेली झाडांची राख तोंडावर टाकून आंदोलन केले.
ठाणे - अंबरनाथ येथील मांगरूळ जागेवरील झाडांना आग लावण्याच्या प्रकारची चौकशी करावी यासाठी सेनेचा धडक मोर्चा काढत ठाण्यातील कोपरी भागातील वनवृत्त अधिकाऱ्यांच्या अंगावर जळलेल्या झाडांची राख तोंडावर टाकून आंदोलन केले. राजेंद्र कदम असे वन अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांच्या कार्यालयात घुसून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या आंदोलकांनी वनधिकाऱ्यांच्या अंगावर राख फेकून आणि कुंड्या टाकून आपला निषेध नोंदवला. तसेच वनविभागाच्या संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे म्हणून घोषणा बाजी देखील केली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेने गेल्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून लावलेल्या एक लाख झाडांना समाजकंटकांकडून वारंवार आगी लावण्यात येत असल्याचा आरोप शिवसेने तर्फे करण्यात आला होता.
गेल्या वर्षी, ५ जुलै २०१७ रोजी श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या ८० एकर जागेवर आयोजित वृक्षारोपण महाअभियानातून तब्बल १५ हजारहून अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अवघ्या काही तासांतच एक लाख झाडे लावली होती. त्यानंतर चालू वर्षी देखील अंबरनाथ जवळील जावसई येथे ७० हजार झाडे लावली होती. मात्र, मांगरुळ येथील झाडांना समाजकंटकांचा सुरुवातीपासूनच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी, १९ डिसेंबर रोजी प्रथम समाजकंटकांनी येथे जाळपोळ केली होती. त्यात २० हजारांहून अधिक झाडांचे नुकसान झाले होते. मात्र, त्यावेळी वनविभागाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. पण नंतर उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.