वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजप-मनसेचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 05:41 PM2017-10-11T17:41:13+5:302017-10-11T17:41:24+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पण हे तर मध्य रेलवेच्या महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी याआधीच जाहिर केले होते, त्यात खासदार शिंदेंचे योगदान काय? असा सवाल करत हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संताप मोर्चाचे फलीत असल्याचा दावा मनसेने केला आहे. तर भाजपने ‘लोकमत’मधील १६ सप्टेंबरच्या वृत्ताचा दाखला देत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतून जादा लोकल सोडा ही मागणी जीएमकडे केली असल्याने फे-या मिळाल्या असे होर्डिंग्ज शहरभर लावले. त्यामुळे वाढीव फे-यांवरुन रंगलेल्या श्रेयवादाच्या राजकारणाची चर्चा रंगली.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह शहारध्यक्ष मनोज घरत म्हणाले की, खासदार शिंदे हे केवळ प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. मध्य रेल्वेने २८ सप्टेंबर दस-याच्या निमित्ताने जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १ नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणेपुढील प्रवाशांना दिलासा मिळणार असे स्पष्ट नमूद केले होते. मात्र तरीही शिंदेंनी केलेला प्रयत्न हा केविलवाणा होता. शिंदेंसोबत जाणा-या प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांवरही कदम यांनी नाराजी व्यक्त केली. आता संघटनाही प्रसिद्धीच्या मागे लागल्या का? असा टोला त्यांनी लगावला.
घरत म्हणाले की, संताप मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या आवाहनानूसार गेल्या काही दिवसांपासून स्थानक परिसरात फेरिवाले बसत नाहीत हे सकारात्मक चित्र आहे. तसेच त्या मोर्चाच्यावेळी रेल्वे अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत देखिल ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्या उपनगरिय प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी यांनी मांडल्या होत्या हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे सर्व यश हे संताप मोर्चाचे असून ते लाटण्याचा प्रयत्न करु नये असे कदम म्हणाले.
चौकट: खासदार शिंदेंनी अंबरनाथ स्थानकाचा कायापालट होणार, हे होणार ते होणार असे सांगितले. पण ते कधी होणार, त्याचे डेटलाइन काय? ते प्रकल्प वेळेतच पूर्ण होणार का? असे सवाल मनसेने उपस्थित केले. की गेल्या तीन वर्षांप्रमाणेच या घोषणाच आहेत का? जे आहे ते सांगा की असे कदम म्हणाले.