वेदर शेडवरील कारवाईचा पुनर्विचार करण्याची शिवसेना, भाजपाची आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:44 PM2018-11-28T15:44:29+5:302018-11-28T15:45:54+5:30
वेदर शेड काढण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर, शिवसेना आणि भाजपावाले आता वेदर शेडच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. वेदर काढण्यात येऊ नयेत आणि दंड आकारण्यात येऊ नये अशी मागणी या दोनही पक्षांनी केली आहे.
ठाणे - महापालिकेची परवानगी न घेता पावसाळ्यापूर्वी इमारतींवर उभारण्यात आलेल्या वेदर शेड्स तात्काळ काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकतेच दिले आहेत. परंतु त्या काढण्यात येऊ नयेत अशी मागणी आता शिवसेना आणि भाजपाने लावून धरली आहे. तर पालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सुरवात आपल्यापासून करावी अशी मागणी दक्ष ठाणेकर नागरीकांनी केली आहे.
सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी याबाबत स्पष्ट करताना महापालिकेची परवानगी न घेता पावसाळ्यापूर्वी ज्या वेदर शेड्स उभारण्यात आल्या आहेत त्या वेदर पावसाळा संपल्यानंतरही काढून टाकण्यात आलेल्या नाहीत, त्या तात्काळ काढण्याच्या सूचना दिल्या. तथापी या वेदर शेड्स काढण्यापूर्वी संबंधितांकडून मुळ रक्कम रूपये ५ हजार आणि दंडाची रक्कम रूपये ५ हजार असे दहा हजार रूपये वसूल करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अतिक्र मण विभागास दिले. दरम्यान महापालिकेच्यावतीने सूचना दिल्यानंतरही वेदर शेड्स काढल्या नाहीत तर त्या महापालिकेच्यावतीने काढण्यात याव्यात आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याच्या सूचना देतानाच ज्यांनी पैसे भरून फक्त पावसाळ्यात तात्पुरते वेदर शेड उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली आहे त्या शेड्सही तात्काळ काढण्याचे आदेश दिले.
परंतु महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात भाजपाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी केली आहे. काही लोक या आदेशाला ग्रेट म्हणतील, त्याची तारीफ करतील सुद्धा परंतु सामान्य, मध्यमवर्गीय इमारतीत राहणारे कुटुंब दुसरा काही पर्याय नाही म्हणून हा उपाय करीत असतो. तो सुध्दा न परवडणारा खर्च करून त्यामुळे या आदेशाचा फेरविचार व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुसरीकडे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सुध्दा या संदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र लिहिले असून दंड आकारण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. वेदरशेड दंड आकारणी सरसकट न करता ज्या वेदर शेडचा वापर वाणिज्य वापरासाठी केला जात असेल त्यांच्याकडून हा दंड आकारण्यात यावा, परंतु इतर इमारतधारक हे पावसाळ्यात पाणी घरात शिरु नये, गळती होऊ नये म्हणून शेड लावत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करु नये अशी मागणी केली आहे. एकूणच आता आयुक्त या बाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
परंतु दुसरीकडे महापालिका मुख्यालयाच्या वरील बाजूस सुध्दा अशा प्रकारे काही ठिकाणी वेदर शेड लावण्यात आल्या आहेत. हजेरी शेडसुध्दा पालिकेच्या अनेक ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. त्यासुध्दा बेकायदा असल्याचा मुद्दा दक्ष नागरीकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आधी यावर कारवाई व्हावी मग इतरांचा विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.