Shivsena : शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, रामदास कदम यांचे वादग्रस्त बॅनर झळकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:25 PM2021-10-17T23:25:11+5:302021-10-17T23:26:34+5:30
Shivsena : ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, बाप बापच असतो,’ असा मजूकरही त्या डिजिटल बॅनवर छापण्यात आला आहे.
ठाणे - माजी मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता, रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाणे शहरात बॅनरबाजी केल्यामुळे कदम यांचे नाव चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब(Anil Parab) यांच्याबाबतच्या ऑडिओ क्लिपममुळे रामदास कदम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल होते. त्यातूनच आता ही बॅनरबाजी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ही बॅनरबाजी करण्यात आल्याने अधिक चर्चा होत आहे.
ठाण्यातील या पोस्टरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. त्याखाली 'कोकणचा ढाण्यावाघ' असे लिहिण्यात आलेले आहे. तसेच, ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, बाप बापच असतो,’ असा मजूकरही त्या डिजिटल बॅनवर छापण्यात आला आहे.
रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात येण्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मेळाव्याला येत नसल्याचं सांगितलं होतं. तत्पूर्वी रामदास कदम यांच्या वादग्रस्त क्लीपमुळे त्यांना दसरा मेळाव्याला शिवसैनिक येऊ देणार नसल्याची चर्चा शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.
रामदास कदम हे मागील तीन महिन्यांपासून आजारी आहेत. कदम यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात आणि घरी दोन महिने उपचार सुरू होते. संसर्ग वाढू नये, यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं. मात्र, कदम आणि शिवसेना यांच्यात ऑडिओ क्लीपमुळे वादाची दरी निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ऑडिओ क्लीप व्हायरल
काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या आवाजाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात कदम भाजप नेते किरीट सोमय्या यांना परीवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे देण्यासंदर्भात एका कार्यकर्त्यांशी बोलत असल्याचं समोर आलं होतं. या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं. त्यामुळे आज होणाऱ्या दसरा मेळाव्यास शिवसेना नेते रामदास कदम उपस्थित रहाणार की नाही यावर मोठी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होती. पण आता ते मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.