खेळ सेना-राष्ट्रवादीचा, ठरणार डोकेदुखी भाजपाला; 'या' कारणासाठी हवीय आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:05 PM2022-01-18T18:05:46+5:302022-01-18T18:09:57+5:30
ठाणे : एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांनी ‘ही दोस्ती तुटायची नाय’च्या आणाभाका घ्यायच्या आणि स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी एकमेकांची ...
ठाणे : एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड यांनी ‘ही दोस्ती तुटायची नाय’च्या आणाभाका घ्यायच्या आणि स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी एकमेकांची जाहीर उणीदुणी काढायची ही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची विरोधी भाजपला नगरसेवकांच्या फोडाफोडीत यशस्वी न होण्याबरोबरच राजकीय चर्चेपासून दूर ठेवण्याची राजकीय रणनीती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ठाण्यात शिंदे-आव्हाड यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाची भाजपमध्ये उणीव असून त्याचा फायदा उठवत एका मोठा शहरातून भाजपला अदखलपात्र करण्याचा महाविकास आघाडीतील पक्षांचा प्रयत्न आहे.
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेबरोबर युती व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रबळ इच्छा आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे आघाडीच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदे आणि आपल्या मैत्रीचे दाखले ते वारंवार देत आहेत. खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात या दोघांनी दोस्तीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे दिसून आले. परंतु स्थानिक पातळीवरील नेते व मुख्यत्वे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना राष्ट्रवादीला सोबत घेणे फारसे पसंत नाही. शिवसेना स्वबळावर सत्ता आणू शकत असताना यशात वाटेकरी कशाला, अशी त्यांची भूमिका आहे. आघाडीवरून असेच वाद सुरू राहिले तर दोन्ही पक्षातील जे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असतील ते गोंधळलेल्या अवस्थेत राहतात. त्यामुळे फाटाफूट होत नाही. शिवाय आघाडीच्या शक्याशक्यतांमुळे भाजप चर्चेतून हद्दपार झाली.
'या' कारणासाठी राष्ट्रवादीला हवीय आघाडी
राष्ट्रवादीचे काही नगरसेवक येत्या काळात पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भिस्त ही कळवा, मुंब्य्रावर आहे. परंतु कळव्यात शिवसेनेने ‘मिशन कळवा’ मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आघाडी झाली तर नगरसेवकांच्या शिवसेनेत जाण्यास आपोआप चाप बसणार आहे. मात्र आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपला त्याचा फायदा होऊन, त्यांच्या जागा वाढतील. सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यात तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला तर ती राष्ट्रवादीकरिता मोठी नामुश्की असेल.