आयुक्तांची कामे शिवसेना आपल्या नावावर खपवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:59 AM2018-02-22T00:59:41+5:302018-02-22T00:59:44+5:30
आयुक्तांसोबतची मैत्री ही केवळ शिवसेनेचा एक स्वार्थ आहे. शिवसेनेकडून विकास कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून जी विकास कामे होत आहेत
ठाणे : आयुक्तांसोबतची मैत्री ही केवळ शिवसेनेचा एक स्वार्थ आहे. शिवसेनेकडून विकास कामे झालेलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून जी विकास कामे होत आहेत, त्यावर आपला हक्क सांगण्याचा शिवसेनेनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशा शब्दांत भाजपाचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला. उलटपक्षी शिवसेनेनी ज्या पद्धतीने प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवायला हवे होते, ते होतांना दिसत नाही. आम्ही त्याबाबत विचारणा केली तर त्यात गैर काय असा सवालही केळकर यांनी केला आहे.
भाजपाचा नेहमीच विकास कामांना पाठिंबा असून यापुढेही तो राहील. परंतु एखाद्या कामात अनियमितता असेल तर त्याबाबत विचारणा केल्यास त्यात गैर असे काहीच नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाकडून काही अनियमितता असलेले ठराव केले जात असतील तर या बाबी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम आमचेच असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. पण म्हणून आम्ही आयुक्तांच्या विरोधात भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचे काम करीत आहोत, असे म्हणणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. चुकीचे ठराव असतील आणि त्याबाबत आक्षेप घेतले जात असतील तर ते आक्षेप चर्चेतून सोडविणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चेतूनच उत्तरे दिल्यास अशी वेळ येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्तांनी केलेल्या चांगल्या कामांचे आम्ही नेहमीच कौतुक केले आहे. परंतु, त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी एकत्रित बसून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, अशी भूमिका ही त्यांनी मांडली. पाटणकर यांच्यावर केलेली एमआरटीपीची कारवाई ही त्यांच्या एकट्यावरच केली आहे का? शेजारीशेजारी फ्लॅट एकत्र केले म्हणून अन्य किती जणांवर कारवाई केली हेही तपासावे लागणार आहे. परंतु, हे सर्व केवळ गैरसमजुतीनच होत असावे, असा सूर त्यांनी लावला.
ुमंगळवारच्या महासभेत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भावनाविवश होऊन भाजपाच्या काही ठराविक पदाधिकाºयांच्या विरोधात अप्रत्यक्ष टीका करुन माझ्या विरोधात ठराव करा आणि मला परत शासनाकडे पाठवा, असे आवाहन केले. यामुळे कालपर्यंत भाजपाच्या जवळ समजले जाणारे आयुक्त आता एवढे का दुरावले अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात आमदार केळकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी वरील शब्दात आपली भूमिका मांडली.
आयुक्तांचे काहीतरी गैरसमज झाले असावेत, ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्यात आणि भाजपाच्या स्थानिक मंडळींच्या विरोधात असलेले मतभेदही दूर करु, असा सूर केळकर यांनी आळवला.