आधीच उल्हास... भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी 'या' पक्षाला टाळी देणार शिवसेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 02:45 AM2018-02-06T02:45:07+5:302018-02-06T14:04:55+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, भारिपा हे सर्व शिवसेनेसोबत असल्याने....
उल्हासनगर : सत्तेत असूनही आर्थिक नाड्या हाती येत नसल्याच्या नाराजीतून साई पक्षाने भाजपाचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिल्याने उल्हासनगरच्या राजकारणात शिवसेना आपसूक किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. साई पक्ष असो की भाजपातील ओमी टीम सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे सांगत शिवसेनेने उल्हासनगरच्या सत्तापालटात उडी घेतली आहे. पाठिंबा काढण्याच्या इशा-यानंतर साई पक्षाशी भाजपा नेत्यांनी चर्चा केली. पण मी समाधानी नाही, असे त्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केल्याने उल्हासनगरमधील सत्तेचा तिढा सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा बनला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, भारिपा हे सर्व शिवसेनेसोबत असल्याने शिवसेनेच्या गटाचे संख्याबळ ३४ आहे, तर भाजपा आणि ओमी टीमचे संख्याबळ ३३ आहे. त्यामुळे ११ सदस्य असलेला साई पक्ष ज्याच्यासोबत जाईल, तो पक्ष सत्तेत येईल, हे गृहीत आहे. मात्र सत्तेत असून, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही आर्थिक पॅकेज मिळत नसल्याने नसल्याने साई पक्ष नाराज आहे. आजवर वेळोवेळी साई पक्षाने मोजक्या सदस्यांच्या बळावर उल्हासनगरच्या सत्तेत विविध पक्षांना खेळवले. तोच प्रयोग नव्याने सुरू झाला आहे. त्यामुळे ओमी टीमच्या भाजपा प्रवेशापासून साई पक्षाला सत्तेत घेण्यापर्यंत सत्तेचे सर्व मोहरे हाताळणारे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी साई पक्षाच्या नेत्यांची चर्चा घडवण्यात आली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांच्यासोबत ही चर्चा झाली. ती ७० टक्के यशस्वी झाल्याचे आयलानी म्हणाले. पण साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी मात्र चर्चेनंतर मी समाधानी नसल्याचे सांगत एकप्रकारे चर्चा फिसकटल्याचेच स्पष्ट केले. मी महिनाभराची मुदत दिली आहे. आता निर्णय भाजपाने घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाशी सत्तासंगत सोडल्यानंतर साई पक्ष सत्तेशिवाय राहणार नाही. तो शिवसेनेसोबत जाईल, असे मानले जाते. त्यामुळे शिवसेनेने साई पक्ष, ओमी टीम या दोघांचेही स्वागत केले आहे.
भक्कम संख्याबळ राखून असलेल्या ओमी टीमने भाजपासोबत असल्याची भूमिका घेतली आहे. नगरसेविका सविता तोरणे-रगडे वगळता त्यांचे नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांना पक्षात फूट पाडून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे भाजपानेही सव्वा वर्षाच्या महापौरपदाचे ओमी टीमला दिलेले आश्वासन पाळणार असल्याचे सांगत त्यांना शांत केले आहे. एकेकाळी उल्हासनगरच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या कलानी कुटुंबाचे राजकीय भवितव्य, त्यांचे महापौरपद सध्या तरी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हाती आहे.
साई पक्षामुळे ओमी टीमला वारंवार डावलल्याची भावना त्या टीममध्ये आहे. त्यामुळे साई पक्षाने पाठिंबा काढण्याचा दिलेला इशारा त्यांच्या पथ्यावर पडला आहे. शिवसेनेने जरी अप्रत्यक्षरित्या ओमी टीमला भाजपातून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करण्यास सुचवले असले तरी ओमी कलानी यांना अजूनही सव्वा वर्षाच्या महापौरपदाचे आपल्याला दिलेले आश्वासन पाळले जाईल, असा विश्वास वाटतो. त्यामुळे त्यांनी राज्यमंत्री चव्हाण यांच्या नेतृत्तवावर विश्वास व्यक्त करत तूर्त तरी बंडाचा पवित्रा घेणार नसल्याचे दाखवून दिले.
साईची सद्दी संपवण्याची मागणी
मोजक्या नगरसेवकांच्या बळावर दरवेळी साई पक्ष सत्ताधाºयांना वेठीला धरून आपल्याला हवे ते आर्थिक लाभ पदरात पाडून घेतो. त्यातून उल्हासनगरमध्ये सत्ता टिकवता येते, पण शहर आणखी गाळात जाते. ठेकेदारच राज्य करतात. त्यामुळे राज्यातील सत्तेप्रमाणेच शिवसेनेसोबत युती करावी आणि साई पक्षाची सद्दी संपवावी. सत्तेसाठीचे त्यांचे ब्लॅकमेलिंग थांबवावे, अशी भाजपातील एका गटाची भूमिका आहे. त्यामुळे भाजपा साई पक्षाची मनधरणी करते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली, तर वेगळे राजकीय चित्र उभे राहू शकते.
टाळी देण्यास शिवसेना तयार
शहराच्या विकासासाठी शिवसेनेची दारे सर्वांसाठी खुली असल्याची प्रतिक्रिया शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.ओमी टीमने भाजपातून बाहेर पडून वेगळा गट निर्माण करावा, तरच त्यांच्याशी पुढील वाटाघाटी करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. साई पक्षाने हात पुढे केल्यास त्यांनाही शिवसेना टाळी देईल, असे सांगत चौधरी यांनी अप्रत्यक्षरित्या सत्तांतराचे संकेत दिले.
कोणाची काय भूमिका?
- प्रश्न ७० टक्के सुटला भाजपा
- समाधानी नाही साई पक्ष
- भाजपावर अजून विश्वास ओमी टीम
- सर्वांसाठी दरवाजे खुले शिवसेना