‘ठाणे शहर’ शिवसेनेने गमावलेच

By admin | Published: February 24, 2017 07:06 AM2017-02-24T07:06:51+5:302017-02-24T07:06:51+5:30

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द

Shivsena lost Thane city | ‘ठाणे शहर’ शिवसेनेने गमावलेच

‘ठाणे शहर’ शिवसेनेने गमावलेच

Next

अजित मांडके / ठाणे
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द आणि एकत्रितपणे ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे शिवसेनेला तब्बल २५ वर्षांनंतर ठाण्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत गमावलेला ठाणे शहर हा मतदारसंघ त्यांना पुन्हा काबीज करता आलेला नाही.
चारसदस्यीय पॅनल हे शिवसेनेच्या फायद्याचे ठरले असून अनेक प्रभागात शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. आता कुणाच्याही कुबड्या न घेता त्यांना पुढील पाच वर्षे सत्तेची गोड फळे चाखण्यास मिळणार आहेत.
या निवडणुकीत शिवसेनेने सुरुवातीपासून ७५ जागांचा दावा केला होता. परंतु, काही गणिते बिघडल्याने आणि काही ठिकाणी अतिआत्मविश्वासामुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. परंतु, दिव्यासकट, घोडबंदर, वागळे, किसननगर, कोपरी या भागात शिवसेनेने मारलेल्या जोरदार मुसंडीच्या जोरावर शिवसेनेला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळून त्यांनी ६७ जागांवर कब्जा केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला ठाणे शहर हा मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला गमावावा लागला होता. त्यामुळे हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेने सावध पावले उचलली होती. उमेदवार देतानाही कोणीही नाराज होणार नाही आणि दिग्गजांनाच संधी देऊन हा गड काबीज करण्याची रणनीती आखली होती. परंतु, मतदारांनी विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतदेखील भाजपाला झुकते माप दिले आणि या पट्ट्यात शिवसेनेचा पराभव झाला. दिव्यात शिवसेनेने मिळवलेले यशही नाकारता येणार नाही. या ठिकाणी भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण केले होते. मनसेनेदेखील राज ठाकरे यांना दोन वेळा आणले होते. परंतु, शिवसेनेने येथे केवळ विभागीय मेळाव्यावर भर देऊन येथे ११ पैकी ८ जागा मिळवल्या आहेत. एका जागेवर त्यांना सुमित भोईर यांच्या पराभवाची चव चाखावी लागली.
दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांनी दाखवलेले कसब आणि त्यांनी प्रत्येक विभागाची उचललेली जबाबदारी यामुळे शिवसेना भाजपाच्या वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे. शिवाय, शिवसैनिकांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेला एकनिष्ठपणा, एकोपा, ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची धमक, निष्ठावंतांना एकत्रित घेऊन चालण्याची खेळलेली चाल आणि शिवसेनेने जेवढे आयाराम पक्षात घेतले, त्यातील एखाददुसरे नाणे खोटे ठरता इतर नाणी खणखणीत वाजल्याने शिवसेनेला यश मिळाले. एकूणच शिवसेना ठाण्यात भाजपाच्या सर्वच बाजूंनी वरचढ ठरली आणि यातूनच त्यांना एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्न साकार करता आले आहे.

Web Title: Shivsena lost Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.