शिवसेनेने केले भाजपाला टार्गेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 03:15 AM2017-08-17T03:15:53+5:302017-08-17T03:16:13+5:30
पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने ही यंत्रणा भाजपाच्या इशा-यावर नाचत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये भाजापा उमेदवार पैसे वाटप करत असल्याची तक्रार करूनही निवडणूक प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने ही यंत्रणा भाजपाच्या इशा-यावर नाचत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नरेंद्र मेहता यांनाही त्यांनी लक्ष्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल सत्ताधारी भाजपाला पाठिंबा दिल्यासारखे वागत असल्याने त्यांना सेनेच्या स्टाईलने धडा शिकविला जाईल, असा इशारा दिला.
सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्टाचाराला मतदार कंटाळल्याचा फायदा शिवसेनेला मिळेल, असा दावा त्यांनी केला. नवघर परिसर, विनायकनगर परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप होत असल्याची करीत असल्याची तक्रार करूनही निवडणूक प्रशासन आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करणे सोडा, साधी चौकशीही न केल्याचा आरोप आमदारांनी केला. पोलीस आणि निवडणूक अधिकाºयांवर भाजपा मंत्र्यांचा दबाव आहे. या घटनेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर होते. ते पाहता शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नवघर पोलीस ठाण्यात तळ ठोकूनही पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही, असे सांगत सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. गुन्हेगारांना पाठीशी घालणाºया अधिकाºयांना शिवसेना सोडणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी बागल यांना सेनेच्या स्टाईलने धडा शिकविला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपाच्या स्थानिक आमदाराने भ्रष्टाचाराचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला असून त्यांनी सरकारी महसूल बुडविल्याचा प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे आ. बच्चू कडू यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. त्यावर सरकारने साधी चर्चाही केली नाही, असे सांगत त्यांनी आमदार मेहता यांच्यावरही टीका केली. आमदार मेहता यांचे जुने व नवीन घोटाळे शिवसेना बाहेर काढणार असा इशाराही सरनाईकाांनी दिला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक, पदाधिकारी अरुण कदम उपस्थित होते.
>खा. विचारे यांनीही भाजपा मतदारांना पैशांचे वाटप करीत असून मतदानासाठी धमकावत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्याचा विकासाचा मुद्दा खोडून काढत त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील ६५०० कोटी आणि ठाणे महापालिका निवडणुकीतील ३६०० कोटींचा निधी विकासकामांसाठी देण्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.