विधानसभा निवडणुकीच्या निधीसाठी शिवसेनेने केला आरोग्य घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:59 PM2019-06-17T17:59:36+5:302019-06-17T17:59:49+5:30
शहराच्या विविध भागात एकूण 50 आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे.
ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाणे पालिका ‘आपला दवाखाना’ नावाची संकल्पना सुरु करीत आहे. किसननगर आणि कळवा येथे सुरु केलेली ही संकल्पना पुर्णत: फोल ठरली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात 26 आरोग्य केंद्रांची गरज आहे. तरीही, अतिरिक्त 50 केंद्र सुरु करुन सुमारे 160 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचे कारण काय? असा सवाल करुन, मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडला हा ठेका देऊन त्याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोप ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या दवाखान्याच्या निविदा प्रक्रिेयेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव 19 तारखेच्या महासभेत पटलावर ठेवण्यात आला आहे. मात्र, ही मंजुरी मिळण्याआधीच दि. 14 जून रोजी वृत्तपत्रांमधून निविदा नोटीस जारी करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागात एकूण 50 आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. या संकल्पनेस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मिलींद पाटील यांनी हा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक मुकूंद केणी, शानू पठाण उपस्थित होते.
ठाणे महानगर पालिकेने मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमीटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना ( ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य केंद्र सुरु करताना दर 50 हजार नागरिकांमागे एक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या 26 लाखांच्या घरात आहे. त्यापैकी 50 टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. एकंदर पाहिल्यास हे आरोग्य केंद्राचा वापर करणार्यांची लोकसंख्या पाहता ठाणे शहरात 26 आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात 28 आरोग्य केंद्र आहेत. त्यामुळे अतिरिक्त 50 केंद्र सुरु करुन ठाणेकरांच्या 160 कोटी रुपयांची उधळपट्टीच केली जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत. त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये 10 रुपये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसन नगर आणि कळवा येथे राबविण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. या केंद्रांवर एकही माणूस फिरकत नाही. तरीही, आणखी पन्नास ठिकाणी ही योजना राबवून त्या माध्यमातून टक्केवारी घेण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे. ‘आपला दवाखाना’ मुळे ठाणे महानगर पालिकेला पाच वर्षांसाठी 144 कोटी आणि भांडवली खर्चापोटी 15.60 कोटी असे सुमारे 159.60 कोटी मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमीटेड या एजन्सीला द्यावे लागणार आहेत. हा सर्व ठाणेकरांच्या पैशांचा अपव्ययच आहे.
आजघडीला ठाणे महापालिकेच्या 28 आरोग्य केंद्रांची वाताहत झालेली आहे. सकाळी 9 वाजता उघडण्यात येणारी ही उपकेंद्रे अवघ्या दोनच तासात म्हणजे अकरा वाजता बंद करण्यात येत आहेत. अनेक आरोग्य केंद्रांवर छत नाही तर, अनेक ठिकाणी नर्स, डॉक्टर उपलब्ध नाहीत; त्यांची अवस्था सुधारण्याची गरज असताना हे ‘आपला दवाखाना’ आणून ठाणेकरांच्या करातून मिळणार्या पैशाचा अपव्ययच केला जाणार आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठीच ही संकल्पना राबविण्यात येत आहे. साधारणपणे 10 टक्के रक्कम जरी शिवसेनेला मिळाली तरी त्यातून बराच निधी निवडणुकीसाठी जमा करता येणार असल्याने हा घाट घालण्यात आला आहे, असा आरोपही मिलींद पाटील यांनी यावेळी केला.
विशेष म्हणजे, 19 जून रोजी होत असलेल्या महासभेमध्ये इच्छुक निविदाकारांकडून निविदा मागवण्यासाठीच्या प्रक्रियेचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याच्या आधीच संबधीत अधिकार्यांनी 14 जून रोजीच निविदा नोटीस वृत्तपत्रांच्या माध्यमातून जारी केली आहे. म्हणजेच, हा प्रस्ताव मंजूर होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. त्यामुळे महासभेच्या मंजुरीआधीच निविदा काढणार्या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली आहे.