शिवसेना सरसावली; भाजपाला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:09 AM2018-09-20T04:09:35+5:302018-09-20T04:09:56+5:30
महापालिकेसह राज्य व केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपा प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणण्यात सक्षम नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
उल्हासनगर : महापालिकेसह राज्य व केंद्रात सत्ता असणाºया भाजपा प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणण्यात सक्षम नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांना आता पालिकेत आम्ही आणू, असे आव्हान शिवसेनेने दिल्याने ऐन महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत.
उल्हासनगर महापालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या जोडीला प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नसल्याने पाटील यांच्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. सध्या ते ‘एकला चलो रे’ भूमिका वठवत आहेत. परिणामी, महापालिकेच्या कामकाजात सावळागोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. अतिरिक्त आयुक्तपद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असून एकमेव उपायुक्त संतोष देहरकर आजारपणाच्या दीर्घ रजेवर गेले आहेत. इतर १ व २ प्रवर्गांतील ८० टक्के पदे रिक्त आहेत. महापालिकेचा कारभार कनिष्ठ अधिकारी हाकत असून सर्वच विभागांत भोंगळ कारभार सुरू आहे. असाच कारभार काही महिने सुरू राहिल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास पालिका सक्षम राहणार नाही, असा टोला चौधरी यांनी लगावला आहे.
आयुक्तांनी राज्य सरकारकडे अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहायक आयुक्तांसह इतर अधिकारी प्रतिनियुक्तीवर देण्याची मागणी केली. तसेच सत्ताधारी भाजपानेही राज्य सरकारकडे प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांची मागणी केली. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. शिवसेना स्टाइलने आंदोलन व मागणी केल्यानंतरच राज्य सरकारला जाग येऊन प्रतिनियुक्तीवरील अधिकारी मिळतील, असे मत चौधरी यांनी व्यक्त केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालिकेतील कारभार व अपुºया अधिकाºयांच्या संख्येबाबत सविस्तर माहिती दिली असून गणेशोत्सवानंतर पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
शहरातील विकासकामे झाली ठप्प
राज्य सरकारकडे सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाºयांची मागणी यापूर्वीच केली. मात्र, राज्य सरकार जाणीवपूर्वक अधिकाºयांची नेमणूक करत नसल्याने शहर विकासाची कामे ठप्प झाली आहेत. याला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.