सेनेच्या कंटेनर शाखांवरून दिवाळीत राजकीय फटाके; मीरा-भाईंदरमधील प्रकार; सहा शाखा स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 08:10 AM2023-11-17T08:10:14+5:302023-11-17T08:10:21+5:30
पालिकेने कारवाई न केल्यास आम्हीसुद्धा कंटेनरमध्ये कार्यालये उघडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मीरा रोड : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथावर सहा ठिकाणी कंटेनर ठेवून शाखांची उद्घाटने आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्यानंतर या बेकायदा कंटेनर शाखांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी विविध पक्षांनी केली आहे. पालिकेने कारवाई न केल्यास आम्हीसुद्धा कंटेनरमध्ये कार्यालये उघडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ठाकरे गटाच्या माजी गटनेत्या नीलम ढवण, माजी उपमहापौर प्रवीण पाटील, मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप काकडे, जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे आदींनी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेतली.
हा प्रकार चुकीचा असून उद्या सर्वच राजकीय पक्ष अशी रस्ते-पदपथांवर कार्यालये उघडतील. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत.
- किशोर शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप
आपण शहरात शिवसेनेच्या अनेक शाखा उभारल्या व जुन्या शाखांचे पुनर्निर्माण केले. वातावरण बिघडू नये व वाद होऊ नये म्हणून सुरुवातीपासून काळजी घेत शाखांवर दावा केला नाही, ही माझी चूक झाली का? शहरात तशी अनेक पक्ष कार्यालये अनधिकृत आहेत. स्वतःची अनधिकृत पक्ष कार्यालये चालतात; पण शिवसेनेच्या शाखा का नकोत? कारवाई करायची तर सर्वांवर करावी.
- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना