Shivsena: शिदेंच्या ठाण्यात यंदा 'निष्ठेची दहिहंडी', शिवसेना खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 09:43 AM2022-08-18T09:43:57+5:302022-08-18T09:45:33+5:30
Shivsena: कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याठाणे शहरातील दहिहंडी उत्सवाकडे यंदा महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण, शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना महाराष्ट्रात होत आहे. त्यातच, ठाण्यात एकनाथ शिंदेंनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर शिवसेनेनं केदार दिघेंना शिवसेना जिल्हाप्रमुखपद दिले. तर, दुसरीकडे खासदार राजन विचारे हेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहेत. त्यामुळे, यंदा आम्ही निष्ठेची दहिहंडी साजरी करणार असल्याचं खासदार विचारे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा दोन वर्षाचा काळ लोटल्यानंतर यंदा शहरात दहिकाला उत्सव जोरात साजरा होणार आहे. यंदाच्या वर्षी दहीहंडीची पंढरी असलेल्या या गोविंदाच्या नगरीत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने ठाण्यातील टेम्बी नाका येथे सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहिकाला उत्सवासोबतच सेनेचे खासदार राजन विचारे यांनी जांभळी नाका येथील हंडी म्हणजे निष्ठेची हंडी असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. यंदाच्या हंडीत सहभागी होणाऱ्यांचा सन्मान केला जाईल. ठाण्यात सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून मुख्यमंत्री पद मिळविल्यानंतर राजन विचारे यांनी यंदाच्या हंडीला निष्ठेची हंडी असं नाव दिल आहे. हंडीचा सण म्हणझे सचोटी आणि विश्वास अश्या प्रकारचा उत्सव असल्याचे विचारे यांनी म्हटलं.
दहिहंडी उत्सवासाठी वाहतुकीत बदल
टेंभी नाका येथे होणाऱ्या दहिहंडी उत्सवासाठी शहरातील वाहतूकीमध्ये बदल केल्याची अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेने काढली आहे. त्यामुळे यावेळी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी केले आहे. मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ येथे १९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रीक नाकामार्गे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथून उजवीकडे वळण घेऊन एवन फर्निचर मार्गे ही वाहने जातील.