ठेकेदाराकडून शिवसेनेला पाकीट

By admin | Published: February 16, 2017 01:50 AM2017-02-16T01:50:03+5:302017-02-16T01:50:03+5:30

नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या.

Shivsena wallet from contractor | ठेकेदाराकडून शिवसेनेला पाकीट

ठेकेदाराकडून शिवसेनेला पाकीट

Next

ठाणे : नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारामुळे ठाणे परिवहन सेवेला ८१७ कोटींचा तोटा झाला आहे. अनेक गाड्या तर भंगारातही गेल्या. गोल्डी या ठेकेदारामुळे तर शिवसेनेला लाखो रुपयांचे पाकीट मिळते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. एकीकडे, भाजपा राष्ट्रवादीच्या बाटलीने दूध पित असल्याचा आरोप शिवसेनेने केला असतानाच ‘समृद्धी’ महामार्गाच्या कामाचे ‘निप्पल’ मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या तोंडात दिले आहे, याचाही शोध घ्यावा, असा पलटवारही त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपा अपयशी ठरले आहे. सार्वजनिक परिवहन हा शहरातील प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असतानाही सत्ताधाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच ठाणेकरांना एखाद्या जनावराप्रमाणे टीएमटीतून प्रवास करावा लागतो, असा आरोप त्यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
एक लाखाच्या लोकसंख्येला ३० बसची गरज लक्षात घेता, ठाणे शहरातील ३० लाखांच्या लोकसंख्येला ६६० बस हव्यात. परंतु, टीएमटीच्या ताफ्यात अवघ्या ४०० बस आहेत. त्यापैकी २०९ भंगारात, तर ७४ बसची विक्री झाली. त्यामुळे केवळ १८० बस या रस्त्यावर आहेत. त्यामुळे टीएमटीच्या प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटलेली आहे. अनेक बसेस या नादुरुस्त असल्याने परिवहनला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेमधून परिवहनच्या ताफ्यात ६३ साध्या तर, ३० नवीन वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. जुन्या आणि नव्या अशा २०० बस रस्त्यावर असून त्या खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्या आहेत. त्यासाठी खासगी ठेकेदार किलोमीटरमागे ५३ रुपये दर आकारत आहे. नवी मुंबईत हाच दर ३५ रुपये आहे. हा ठेकेदार १८ रुपये अधिक आकारत असून त्यातील १० रुपये हे शिवसेनेचा पॉकेटमनी असल्याचा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena wallet from contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.