घोडबंदर किल्ल्यात शिवसेना जागवणार इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:05 AM2019-02-19T05:05:41+5:302019-02-19T05:06:07+5:30
शिवसृष्टीचे घडवणार दर्शन : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मीरा रोड : ऐतिहासिक अशा घोडबंदर किल्ल्याचे पालकत्व मीरा-भार्इंदर महापालिकेस देण्यास मंजुरी मिळवल्याचा विजयोत्सव शिवसेना सरकारी शिवजयंतीदिनी साजरा करणार आहे. या प्रीत्यर्थ किल्ल्याला आकर्षक विद्युत रोषणाई केली असून मंगळवारी किल्ल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ल्यात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टीचे सादरीकरण चित्रफितीद्वारे केले जाणार असल्याचे आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्याचे जतन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी आ. सरनाईक यांनी सात ते आठ वर्षांपासून राज्य शासन, पुरातत्त्व विभागांकडे पाठपुरावा चालवला होता. गेल्या वर्षी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्याकडे झालेल्या बैठकीवेळी प्रस्ताव प्राथमिक स्तरावर मंजूर झाल्याची माहिती त्यावेळी आ. सरनाईक यांनी दिली होती. पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका, शासनाचे अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. शासनाने पत्रक काढून घोडबंदर किल्ला देखभालीसाठी पालिकेकडे सुपूर्द केला.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांना आलेल्या यशाबद्दल शिवसेनेने विजयोत्सव साजरा करण्याची तयारी चालवली आहे. उद्या सायंकाळी घोडबंदर किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाणार असून यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. रवींद्र फाटक आदी उपस्थित राहतील.
किल्ल्याजवळील १४ एकर जागा महसूल विभागाने हस्तांतरित केली असून त्यातील नऊ एकर जागेवर शिवसृष्टी, तर पाच एकर जागेवर निसर्ग उद्यान उभारले जाणार आहे. किल्ल्याची देखभाल व सुशोभीकरण, शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासावर आधारित शिवसृष्टी तसेच संगीत कारंज्यासह निसर्ग उद्यान तयार केले जाण्याचा प्रकल्प अहवाल मंजूर झाला आहे. त्याचे सादरीकरण मंगळवारी चित्रफितीद्वारे दाखवले जाणार आहे. महापालिकेने एक कोटी ८१ लाखांची निविदा पहिल्या टप्प्यातील कामासाठी काढली आहे. जिल्हा नियोजन समितीनेही एक कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे.