शिवसेनेचा गोंधळ उतरला प्रचारात, अंतर्गत संघर्ष भोवला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 04:49 AM2017-08-22T04:49:47+5:302017-08-22T04:50:04+5:30
एकीकडे पुरेशी संघटना बांधणी नसणे, त्यात भाजपाविरोधात भूमिका घेण्याबाबत परस्परविरोध, एकनाथ शिंदेसारखा खंदा नेता प्रचारात नसणे आणि स्वत:च्या वैचारिक भूमिकेचा गोंधळ या सा-यामुळे शिवसेनेला मीरा-भार्इंदरमध्ये अपेक्षेइतके यश मिळू शकले नाही.
ठाणे : एकीकडे पुरेशी संघटना बांधणी नसणे, त्यात भाजपाविरोधात भूमिका घेण्याबाबत परस्परविरोध, एकनाथ शिंदेसारखा खंदा नेता प्रचारात नसणे आणि स्वत:च्या वैचारिक भूमिकेचा गोंधळ या सा-यामुळे शिवसेनेला मीरा-भार्इंदरमध्ये अपेक्षेइतके यश मिळू शकले नाही.
मागील निवडणुकीतील १४ जागांवरून शिवसेना २२ जागांवर पोचली असली, तरी आयात उमेदवार आणि माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्या प्रभावक्षेत्रातील उमेदवारांची संख्या वजा केली तर शिवसेनेच्या जागा वाढल्यापेक्षा घटल्याचेच मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांनी मांडले. खास करून खासदार आणि आमदार आपल्या पक्षाचे असूनही शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचे पक्षावर बरेच परिणाम होतील, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेने आपल्या वचननाम्यात हिंदी भाषक भवन उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी मराठीचा मुद्दाही हाती घेतला होता. हा गोंधळ शिवसैनिकाच्या पचनी पडला नाही. एकहाती सत्तेचे किंवा प्रसंगी काँग्रेसला सोबत घेत सत्ता मिळवण्याचे स्वप्न पक्षाने पाहिले होते. भाजपाची सूत्रे नरेंद्र मेहता यांच्या हाती होती. त्यांची कार्यपद्धती शिवसेनेला ठावूक होती. पण त्यांच्याशी कसे लढायचे याबाबतची कमालीचा गोंधळ शिवसेनेच्या व्यूहरचनेत दिसून आला. भाजपातून आणि अन्य पक्षातून आलेल्यांना सामावून घेताना पक्षातील नाराजी वाढली आणि त्याबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांना जाहीर सभेत स्पष्टीकरण द्यावे लागले. या साºयाचा एकत्रित परिणाम होत शिवसेनेला अपेक्षित यश मिळू शकले नसल्याचे दिसून आले.
अंतर्गत संघर्ष भोवला?
शिवसेनेतील अंतर्गत संघर्षही यानिमित्ताने समोर आला. पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात मोजकाच काळ दिसले. त्यांच्या रात्ररात्र चालणाºया मिटींग, दरारा कुठेही जाणवला नाही. शिंदे यांना डावलून प्रताप सरनाईक यांचा थेट मातोश्रीवर संपर्क आहे, असे बोलले जाते. त्याचे प्रत्यंतर प्रचारादरम्यान आले. निवडणुकीची सारी सूत्रे सरनाईक यांच्या हाती असल्याने शिंदे इतके दूर होते की त्याचा उल्लेख करत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला आणि सरनाईक-मेन्डोन्सा हे बाहेरून आलेले नेते शिवसेनेला चालतात, पण एकनिष्ठ शिंदे चालत नाहीत, असा टोला लगावला. त्याची शिवसेनेत बरीच चर्चा रंगली.