शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चक्क कलानींच्या हस्ते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:53 AM2019-04-12T06:53:42+5:302019-04-12T06:53:47+5:30
सत्तेसाठी काय पण : निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी
सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कलानीराजविरोधात उभा ठाकणारा पक्ष म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी खुद्द ओमी कलानी यांच्याच हस्ते झाल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकेकाळी ज्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नव्हती, त्या कलानींसोबत केवळ सत्तेसाठी केलेल्या हातमिळवणीवर टीका होत आहे.
उल्हासनगरातील बहुसंख्य सिंधी मते एकगठ्ठा युतीच्या उमेदवाराला मिळण्यासाठी विचारधारा बाजूला ठेवून शिवसेनेने ओमी कलानी यांच्याकडे मदतीचा हात मागितला. राज्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरण बघता ओमी कलानी यांनी युतीला सशर्त साथ दिली. वास्तविक, शिवसेना म्हणजे कलानीराजविरोधात दंड थोपटून उभा राहणारा पक्ष, अशी शिवसेनेची ओळख आहे. महापालिका निवडणुकीवेळी भाजप नेत्यांच्या रांगेत पप्पू कलानी यांचा फोटो लागल्याने, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. आता तर ओमी कलानी यांच्याच हस्ते शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेत भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपने परंपरागत मित्रपक्ष शिवसेनेला दूर सारून ओमी टीमसोबत आघाडी केली होती. त्यावेळी ओमी टीमचे सर्व उमेदवार भाजपच्या तिकिटावर उभे राहिले आणि कधी नव्हे ते ओमी टीमच्या मदतीने भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले; मात्र त्यांना बहुमत गाठता आले नाही. त्यानंतर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घालून सत्तेसाठी होकार मिळवला. त्यानंतर, भाजप-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता महापालिकेवर आली. महापौरपदाचा मान भाजपच्या मीना आयलानी यांना मिळाला, तर सव्वा वर्षाने ओमी टीमच्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले.
शहरात विरोधी पक्षच नाही - श्रीकांत शिंदे
महापालिकेत २५ नगरसेवक निवडून आलेली शिवसेना विरोधी पक्षात बसली; मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने, दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते गळ्यात-गळे घालून फिरू लागले. भाजपसोबत पालिकेत सत्तेत असलेल्या ओमी कलानी यांनाही युतीच्या बाजूला करण्यात शिवसेना यशस्वी झाली. त्यानंतर, बुधवारी मराठा सेक्शन येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ओमी कलानी यांच्या हस्ते झाले. यावेळी शहरात विरोधी पक्षच शिल्लक नसल्याचे प्रतिपादन युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी केले.