भाजपा-कलानींविरोधात शिवसेनेचा सामना
By admin | Published: February 21, 2017 05:52 AM2017-02-21T05:52:53+5:302017-02-21T05:52:53+5:30
महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात असून ४ लाख १५ हजार ८५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उल्हासनगर : महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात असून ४ लाख १५ हजार ८५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानप्रक्रिया सुटसुटीत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राखण्याकरिता २५०० पोलीस तैनात केले आहेत. ५४३ पैकी ३० मतदान केंदे्र संवेदनशील असून त्यावर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-४ येथील गुरुनानक शाळा, गोलमैदान येथील प्रभाग समिती, व्हीटीसी मैदान येथून निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय मतदार केंद्र कर्मचारी, मतदान मशीन, मतदारयादी आदी साहित्याचे वाटप केले. प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी केल्यानंतर केंद्रप्रमुख, कर्मचारी व पोलीस यांच्या ते ताब्यात देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अडीच हजार पोलिसांच्या मदतीला एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच १०० पोलीस पथके आरक्षित ठेवली आहे. मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ हजार ५०० कर्मचारी तैनात केले आहेत.
शहरात भाजपा-ओमी कलानी टीम विरुद्ध शिवसेना असा बिग सामना रंगणार असून साई पक्ष सिंधीबहुल परिसरात निवडणुकीकरिता सिद्ध झाला आहे. (प्रतिनिधी)
प्रचारसमाप्तीनंतर गुप्त बैठका
रविवारी प्रचारसमाप्तीनंतर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी इमारती, सोसायट्या, झोपडपट्टीतील कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळे, सामाजिक मंडळे, मंदिर विश्वस्त आदींच्या भेटीगाठी व गुप्त बैठका घेतल्या आहेत. शिवसेनेसह भाजपा व ओमी टीमच्या उमेदवारांनी मतदानाच्या शेवटच्या दिवशी फक्त एकच मत द्या, असा प्रचार सुरू केल्याने मतदारांत प्रचंड गोंधळ उडाला आहे.
पोलीस बंदोबस्त
ठाणे महापालिका हद्दीत ७ पोलीस उपायुक्त, २२ सहायक पोलीस आयुक्त, १२७ पोलीस निरीक्षक, ३५१ अधिकारी आणि ५१३१ कर्मचाऱ्यांसह १११० होमगार्ड व चार एसआरपीच्या कंपन्या तैनात केल्या आहेत.