राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेचा झेंडा!, अध्यक्षपदी मंजूषा जाधव, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:05 AM2018-01-16T01:05:38+5:302018-01-16T01:07:10+5:30
कोणतीही फाटाफूट न होता राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेवर सोमवारी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा फडकला आणि साडेतीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली
ठाणे : कोणतीही फाटाफूट न होता राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेवर सोमवारी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा फडकला आणि साडेतीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात आली. शिवसेनेच्या शहापूर येथील सदस्या मंजूषा जाधव अध्यक्ष, तर राष्टÑवादीचे मुरबाड येथील सुभाष पवार उपाध्यक्षपदी विराजमान झाले.
५३ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत स्वत:च्या २५ सदस्यांसह राष्टÑवादीच्या १० सदस्यांना सोबत शिवसेनेने प्रथमच सत्ता स्थापन केली आहे. भाजपाच्या १५ सदस्यांसह त्यांचा एक पुरस्कृत अपक्ष आणि उर्वरित एका काँग्रेस सदस्याचा पाठिंबा मिळवण्याचा दावा करत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही निवड प्रक्रिया ठाणे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी सुदाम परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजपाने मुरबाडच्या नंदा उघडा यांना अध्यक्षपदाची, तर भिवंडीचे अपक्ष उमेदवार अशोक घरत यांना उपाध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. मात्र, पाठिंब्याची खात्री नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दुपारी तीनच्या सुमारास सभागृहात येऊन उमेदवारी मागे घेतले. त्यामुळे जाधव आणि पवार यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी सभागृहात केवळ शिवसेना व राष्टÑवादीचे सदस्य उपस्थित होते. भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले भाजपा सदस्य उल्हास बांगर हे सभागृहातून निघून गेले. जाधव या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत.
अध्यक्ष-उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात मोठ्या संख्येने हजर असलेल्या शिवसेनेच्या मावळ्यांनी आनंद व्यक्त करत घोषणाबाजी केली. अध्यक्ष- उपाध्यक्षांना वाजतगाजत जिल्हा परिषदेत आणले. ‘राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांच्या विचारांना पाठिंबा देत ही निवडणूक एकत्र लढवण्यास सहमती दर्शवल्याने आम्ही जिल्हा परिषदेत एकत्र सत्ता स्थापन केली’ अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे राष्टÑवादीचे सरचिटणीस प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्षा जाधव व उपाध्यक्ष पवार यांनीही सर्वांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील पाणीटंचाईसारख्या समस्या सोडवून जिल्ह्णाचा विकास करणार असल्याचे सांगितले. साडेतीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर मंजुषा जाधव या सहाव्या महिला, तर जिल्हा परिषदेच्या २३ व्या अध्यक्ष झाल्या आहेत.
या निवडणुकीवेळी माजी आमदार गोटीराम पवार यांच्यासह आमदार रवींद्र फाटक, डॉ. बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे, राष्टÑवादीचे अंबरनाथ अध्यक्ष काशिनाथ पाटील, शहापूरचे दशरथ तिवरे आदी शिवसेना व राष्टÑवादीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
५६ वर्षांनी शहापूरला जिल्हाध्यक्षपदाचा मान
शहापूर : मोखावणे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या मंजूषा जाधव याची ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने कसारा बाजारपेठेत शिवसैनिकांनी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला. जाधव यांच्या निवडीमुळे ५६ वर्षानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याचा मान शहापूरला मिळाला आहे. यापूर्वी म्हणजे जिल्हा परिषद अस्तित्त्वात आली तेव्हा म्हणजे १९६२ साली ठाणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शहापूरचे पां. शि. देशमुख हे जिल्हाध्यक्ष झाले होते. शहापूरचे असूनही ते वसई मतदारसंघातून निवडून आले होते. ते दहा वर्ष अध्यक्ष होते. त्यानंतर मात्र अध्यक्षपदाचा मान शहापूरला कधी मिळाला नाही. पुढे कृषी सभापती म्हणून का. रा. पातकर आणि दशरथ तिवरे यांची निवड झाली होती; तर सुनीता दिनकर, विठ्ठल भेरे, वंदना भांडे यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले. मात्र मंजूषा जाधव यांच्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान ५६ वर्षांनी शहापूरला मिळाला. जाधव या १९९५ पासून शिवसेनेचे काम करीत आहेत. सुरु वातीपासूनच १०० टक्के समाजकारण त्यांनी केले. कसारा, मोखावणे, दांड, शिरोळ आदी पट्ट्यातून त्यांनी अनेक महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न केले. १९९७ पासून २०१२ पर्यंत त्या तीन वेळा पंचायत समितीवर निवडून आल्या, तर दोन वेळा सभापती झाल्या. या कालावधीत तालुक्यातील पाण्याचे प्रश्न, रस्ते, आरोग्य अशी विविध कामे त्यांनी हाती घेतली. प्रसंगी आक्रमक होत उपोषण केले. शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.