शेवटच्या दिवशी शिवसेनेची यादी
By admin | Published: January 28, 2017 02:43 AM2017-01-28T02:43:23+5:302017-01-28T02:43:23+5:30
एकीकडे साई पक्ष आणि रिपाइंच्या आठवले गटाशी युतीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेने उल्हासनगरच्या सर्व ७८ जागांसाठी आपल्या इच्छुकांना अर्ज
उल्हासनगर : एकीकडे साई पक्ष आणि रिपाइंच्या आठवले गटाशी युतीच्या वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेनेने उल्हासनगरच्या सर्व ७८ जागांसाठी आपल्या इच्छुकांना अर्ज वाटले. त्यांच्या मुलाखती शनिवारी, २८ जानेवारीला होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. शिवसेनेतील इच्छुकांनी मात्र अर्ज घेताना प्रस्थापितांऐवजी सामान्य-कट्टर शिवसैनिकांना यंदा उमेदवारी द्यावी, अशी मागणी केल्याने नाराजीला तोंड फुटले आहे.
युती तोडल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करताच शिवसैनिकांनी जल्लोष करून भाजपाला धडा शिकविणार, अशी घोषणाबाजी केली.
भाजपाने एकहाती सत्तेसाठी ओमी टीमशी जवळीक साधताच शिवसेनेने ‘एकला चलो’चा नारा देत सर्वच प्रभागात कार्यकर्ता मेळावे घेऊन उमेदवारी अर्ज वाटले. मराठा सेक्शन येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे नेते पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे शनिवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. ‘महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर’ अशी घोषणा देत शिवसेना रिंगणात उरणार आहे.
मराठी पट्टयासह सिंधी परिसरातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील, असा दावा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. (प्रतिनिधी)