कोपरीतील प्रस्तावित रात्र निवारे केंद्राला शिवसेनेच्या काही नगरसेवकांची नकार घंटा, केंद्राचे भवितव्य अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:43 PM2017-11-28T16:43:46+5:302017-11-28T16:46:56+5:30
रात्र निवाऱ्याचे भवितव्य आता अंधातरी येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नौपाड्यापात भाजपाच्या नगरसेवकांनी चुकीच्या रात्र निवारा केंद्राला विरोध केला आहे. दुसरीकडे कोपरीत प्रस्तावित असलेल्या रात्र निवारा केंद्राला आता शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी विरोध करण्यास सुरवात केली आहे.
ठाणे - दुरवरुन येणाऱ्या नागरीकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे असे असतांना देखील ठाणे आपली कातडी वाचविण्यासाठी पालिकेच्या काही महान अधिकाऱ्यानी नौपाड्यातील भर वस्तीत रात्र निवारे उभारण्याचा घाट घालण्याचा प्रकार समोर येत असतांनाच आता कोपरीतील प्रस्तावित रात्र निवाऱ्यालाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध करण्यास सुरवात केली आहे. आमच्या भागात भिकारी, गुर्दले नकोत म्हणून येथील नगरसेवकांनी नकार घंटा वाजविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आता सुरु करण्यात आलेल्या रात्र निवाऱ्याचे कामही अर्धवट राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी रात्र निवारे उभारण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत. परंतु, दिलेल्या निर्धारीत वेळेत पालिकेला हे निवारे उभारण्यात यश आलेले नाही. कोपरी येथे केंद्र सरकारचे दोन कोटी अनुदान आणि पालिकेचे ९४ लाखांंच्या निधीतून रात्र निवारे उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्याला आणखी काही महिने लागणार आहेत. या मुद्यावर न्यायालयात पालिकेची कोंडी होणार असल्याने घाईगडबडीत नौपाड्यातील सोनी पथावर असलेल्या पालिकेच्या इमारतीत हा रात्र निवारा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु पालिकेच्या या निर्णयाविरोधातील पडसाद नुकत्याच झालेल्या महासभेत उमटले होते. त्यामुळे पालिकेचा हा प्रयत्न फसण्याची शक्यता आहे.
नौपाड्यात भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने आता पालिकेला पुन्हा कोपरीतील जागेत रात्र निवारे उभारण्याचे काम वेगाने करावे लागणार आहे. परंतु आता कोपरीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी या रात्र निवारा केंद्राला विरोध दर्शविला आहे. आमच्या भागात भिकारी, गुर्दले नकोत म्हणून त्यांनी नकार घंटा वाजविण्यास सुरवात केली आहे. कोपरीतील एका शिवसेनेच्या नगरसेविकेने याच मुद्यावरुन मंगळवारी पालिकेत एका उपायुक्ताच्या दालनात हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. त्यांना आमच्या कोपरीत नको, दुसरीकडे कुठेही जागा द्या, त्यांच्यासाठी हवेतर आम्ही कपडे, जेवणाची सोय करतो. परंतु आमच्या कोपरीत हे भिकारी नकोत अशी थट्टाच या नगरसेविकेने केली आहे. त्यामुळे याबाबत आता ही नगरसेविका थेट आयुक्तांना देखील पुढील दोन दिवसात निवेदन देणार असल्याचे समजते. केवळ याच नगरसेविकेचा विरोध नसून इतर काही नगरसेवकांनी देखील याला विरोध केला आहे. परंतु आयुक्तांशी पंगा घेणार कोण म्हणून काहींनी दबक्या आवाजात याला विरोध केला आहे. त्यामुळे आता रात्र निवारा केंद्राचे भवितव्यच अधांतरी आल्याचे दिसत आहे.