मोदींच्या दौऱ्यात शिवसेनेवर कुरघोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:42 PM2018-12-12T23:42:43+5:302018-12-13T06:57:57+5:30
ठाण्याऐवजी आता कल्याणात होणार कार्यक्रम, सभेच्या मुख्य व्यासपीठावर कुणाला स्थान?
कल्याण : पुढील आठवड्यात ठाण्यात आयोजित केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आखताना भाजपाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय खेळी खेळली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या ठाण्यात आयोजित करण्याचे प्राथमिक नियोजन सुरू असतानाच, भाजपाने स्वत:च्या ताब्यात असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम खेचून घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता हा कार्यक्रम भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाºया कल्याण पश्चिममध्ये होणार आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ९० हजार घरांचे भूमीपुजन १८ डिसेंबर रोजी कल्याणमध्ये मोदी यांच्याहस्ते होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून त्याचे भूमीपुजन थेट पंतप्रधानांच्याहस्ते होणार असल्याने सरकारी यंत्रणा व भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कल्याण पश्चिमेतील वासूदेव बळवंत फडके मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. २०१४ मध्ये याच मैदानात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी आले होते. आता ते पंतप्रधान म्हणून येणार असल्याने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी फडके मैदानाची जातीने पाहणी करून, मैदानाच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी रेल्वेशी जोडली गेलेली नव्हती. दिवा-वसई या मार्गावर भिवंडी ग्रामीणमधील खारबाव या नावाचे रेल्वे स्थानक होते. ते शहरी भागाशी निगडीत नसल्याने शहरी भाग हा दिवा वसई रेल्वे मार्गाशी जोडला गेलेला नव्हता. भाजपा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंजूरी दिली. मेट्रो प्रकल्पामुळे भिवंडी ठाणे व कल्याण जंक्शन रेल्वेने जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाचा खर्च ८ हजार ४१६ कोटी रुपये आहे. मेट्रो प्रकल्पाप्रमाणेच दहीसर-मिराभार्इंदर हा मेट्रो रेल्वे प्रकल्पही आहे. या प्रकल्पाचा खर्च ६ हजार ६०७ कोटी रुपये आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तळोजा, द्रोणागिरीसह उरण भागात सिडको ९० हजार घरे बांधणार आहे. या प्रकल्पाचा खर्च १८ हजार ६७५ कोटी रुपये आहे. हे विभाग शिवसेना खासदार श्रीकांत बारणे यांच्या मतदार संघात आहेत. या तिन्ही प्रकल्पांचे भूमीपुजन कल्याणच्या फडके मैदानात पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामुळे शिवसेना प्रचंड खवळली आहे.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला. त्यावर मोदी यांनी अद्याप कोणतेही ठोस भाष्य केलेले नाही. मात्र, कल्याणच्या कार्यक्रमात ते काही भाष्य करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भूमीपुजनाचा कार्यक्रम ठाणे येथे घेण्याचे ठरवले जात होते. मात्र ठाण्यात सेनेचे वजन जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुका विचारात घेता कार्यक्रमाचे स्थळ बदलवण्यात आले. कल्याण पश्चिम हा भाग भाजपाकडे असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. भाजपाचे खासदार कपिल पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा कार्यक्रम शिवसेने ऐवजी भाजपाच्या मतदारसंघात घेण्यात यावा, यासाठी भाजपाची मंडळी आग्रही होती. त्यानुसार हा कार्यक्रम ठाण्याऐवजी कल्याण पश्चिमेला ठेवण्यात आला आहे.
आज भाजपाचा मार्गदर्शन मेळावा
पाच राज्यातील निकाल पाहता, कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागले पाहिजे. १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान कल्याणमध्ये येणार असल्याने भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, यासाठी १३ डिसेंबर रोजी कल्याण पश्चिमेतील नवरंग सभागृहात मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे संबोधित करणार आहे. यावेळी भाजपाचे आमदार नरेंद्र पवार व गणपत गायकवाड हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
नाराजी दूर करण्याचा भाजपाचा प्रयत्न
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळ बदलून शिवसेनेऐवजी भाजपाच्या मतदारसंघात ठेवल्याने सेनेची नाराजी येऊ नये, यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार सभेच्या मुख्य व्यासपिठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान दिले जाणार आहे. यूतीच्या अन्य पदाधिकाºयांना मात्र दुय्यम व्यासपिठावर स्थान देऊन त्यांची बोळवण केली जाणार आहे. खा. श्रीकांत शिंदे यांना कोणत्या व्यासपिठावर स्थान मिळेल, याबाबत खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मोदी २०१४ मध्ये कल्याणात आले होते. त्यानंतर साडेचार वर्षांनी ते पुन्हा एकदा येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासाठी खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदारांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत सेनेच्या युतीची भाजपाला गरज भासणार आहे. अशातच पंतप्रधानांचे सभास्थळ ठाण्याऐवजी भाजपाच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये ठेवल्याने सेनेतून नाराजीचा सूर उमटत आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सभेमध्ये मुख्य व्यासपीठावर शिवसेनेच्या दिग्गजांनाही स्थान देण्यात येणार आहे. यातून युतीसाठी भाजपाने एक पाऊल पुढे टाकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पंतप्रधान दुपारी २ च्या सुमारास सुभाष मैदान येथे हेलिकॉप्टरने येतील. तेथून फडके मैदान आणि त्यानंतर पुणे येथे पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. सभास्थानी दोन व्यासपीठ तयार करण्यात येणार आहेत. मुख्य व्यासपीठावर पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील आणि अन्य मान्यवरांना स्थान असेल. पालकमंत्र्यांना प्रमुख व्यासपिठावर स्थान देणे, हा शिष्टाचाराचाच भाग आहे. त्यामुळे त्यात नवलाई नाही. त्यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभेचे खा. श्रीकांत शिंदे यांना कोणत्या व्यासपिठावर जागा मिळते, हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे.
भाजप, शिवसेनेच्या अन्य आमदारांसह युतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मुंबईतील अन्य नेत्यांना दुसºया व्यासपीठावर स्थान दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भूमीपुजन कार्यक्रमानंतर मोदी सभेला संबोधित करणार आहेत. कार्यक्रमपत्रिकेवरही सर्वांना स्थान देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सभेला गर्दी जमवण्याचे नेत्यांपुढे आव्हान
मंगळवार सुटीचा दिवस नसल्याने सभेला गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. बुधवारी भाजपाच्या सर्व खासदार, आमदारांसह पंतप्रधान कार्यालयातील अधिकाºयांनी कल्याणमध्ये सभास्थळाची पाहणी केली.
फडके मैदानाची पाहणी, बहुतांश परवानग्या, आयुक्त गोविंद बोडकेंसमवेत प्रदीर्घ चर्चा असा या शिष्टमंडळाचा भरगच्च कार्यक्रम बुधवारपासूनच सुरू झाला. कार्यक्रमासाठी एमएमआरडीए निधी खर्च करणार आहे. त्यामुळे त्याचे एकूण बजेट समजू शकले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या दौºयासंदभांत भाजपच्या प्रमुख पदाधिकाºयांची मंगळवारी रात्री वर्षावर बैठक घेतली. यावेळी दौºयासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
बुधवारी ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याणचे विभागीय पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरिक्षक आदींच्या ताफ्याने फडके मैदानाची पाहणी केली.
साधारणपणे मुख्य व्यासपीठ, दुसरे व्यासपीठ, सभास्थान आणि अंदाजे ४० ते ५० हजार कार्यकर्र्त्याची गर्दी गृहीत धरुन त्यादृष्टीने नियोजन करणे, सुरक्षा कवच आदी मुद्यांवर चर्चा झाली.