घोडबंदर किल्ल्याजवळ नऊ एकर जागेत उभी राहणार शिवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:50 AM2020-08-29T00:50:51+5:302020-08-29T00:51:00+5:30
प्रताप सरनाईक यांची माहिती : पुरातत्त्व विभागाची मंजुरी
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करण्याबरोबरच किल्ल्याच्या शेजारील मोकळ्या नऊ एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या कामास अखेर राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून ना-हरकत मिळाली अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या किल्ल्याचे जतन व सुशोभीकरण करण्याची मागणी सरनाईक यांनी सरकारकडे केली होती. हा राज्य संरक्षित किल्ला म्हणून ‘महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक योजने’अंतर्गत महापालिकेस संगोपनासाठी देण्याबाबतचा निर्णय सरकारने गेल्यावर्षी घेतला होता. त्यानुसार, पुरातत्त्व विभाग व मीरा- भार्इंदर पालिका यांच्यात करार झाला होता. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पर्यटनस्थळ म्हणून घोडबंदर किल्ल्याचा समावेश करून घेण्यात सरनाईकांना यश आले होते.
या किल्ल्याशेजारी असलेल्या नऊ एकर जागेत ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून ही शिवसृष्टी उभारण्यासाठी महापालिकेने पुरातत्त्व विभागाकडे परवानगी मागितली होती. किल्ल्याच्या तटबंदीपासून ३५ मीटर अंतर सोडून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. किल्ल्याच्या मूळ बांधकामाला इजा पोहोचणार नाही अथवा येथील घटक नष्ट होणार नाहीत, याची दक्षता घेऊन काही अटींवर प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली आहे. घोडबंदरला खाडीकिनारा असल्याने भविष्यात येथे पर्यटकांसाठी वॉटर स्पोटर््स देण्याचा तसेच खाडीकिनारी जेट्टी बांधण्याबाबतही आमदार सरनाईक यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे. तसेच रो-रो सेवा, वसई-ठाणे-भार्इंदर मार्गावर जलवाहतुकीला प्राधान्य मिळू शकते. त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
फाउंटनचे आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास इतिहासप्रेमी व नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. यासाठी घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम करीत असताना त्यामध्ये हा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आहे. म्युझिकल फाउंटन, लॅण्डस्केपिंग गार्डनसह लाइट व साउंड शो ही असेल.