भिवंडीत पाच वर्षांच्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ

By नितीन पंडित | Updated: December 18, 2024 22:43 IST2024-12-18T22:37:40+5:302024-12-18T22:43:58+5:30

Bhiwandi News: भिवंडी शहरातील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आहिद एजाज अन्सारी वय ५ वर्ष असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमूरड्याचे नाव आहे .

Shock as body of five-year-old found in water tank in Bhiwandi | भिवंडीत पाच वर्षांच्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ

भिवंडीत पाच वर्षांच्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ

भिवंडी - शहरातील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.आहिद एजाज अन्सारी वय ५ वर्ष असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमूरड्याचे नाव आहे . १६ डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहिद हरवला होता. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.

आहिदचे वडील एजाज अन्सारी हे पावरलूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात. १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी आहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवले, मात्र तो सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी व स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला. शेवटी शांती नगर पोलिस ठाण्यात आहीद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावरही मुलाच्या हरवल्याची माहिती पसरवण्यात आली होती. स्थानिक नागरिक देखील पोलिसांना सहकार्य करत आहिदचा शोध घेत होते. मात्र बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. सध्या मृतदेह शव विच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अवघ्या पाच वर्षाचा आहिद पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला, यामागील सत्य शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. ही घटना अपघात आहे की दुसऱ्या कोणत्यातरी कृत्याचा परिणाम, यावरही तपास सुरू आहे. या घटनेमुळे आहिदच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अन्सार मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे.

Web Title: Shock as body of five-year-old found in water tank in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.