धक्कादायक! कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागे जळालेल्या अवस्थेत सापडली 10,000 व्होटर कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:15 PM2018-10-10T21:15:04+5:302018-10-10T21:15:25+5:30
मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर कार्ड तयार करून घ्या. त्यात दुरुस्ती करून घ्या, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून सातत्याने केले जात आहे.
कल्याण- मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर कार्ड तयार करून घ्या. त्यात दुरुस्ती करून घ्या, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून सातत्याने केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागच्या बाजूला दहा हजार व्होटर कार्ड मिळाली आहेत. त्यापैकी अर्धी व्होटर कार्ड जळालेल्या अवस्थेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा प्रकार एका जागरुक नागरिकाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.
एपीएमसीचा परिसर 40 एकर जागेचा आहे. या ठिकाणी मोकळ्या जागेत काही मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आढळून आला. त्यांनी जागरुक नागरिक आजम शेख यांना पाचारण केले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्या ठिकाणी बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली. मिळून आलेली काही व्होटर कार्ड ही कल्याण खडकपाडा परिसरातील नागरिकांची असल्याचे त्यावरील पत्त्यावरून दिसून येत आहे. अर्धी कार्डे जळालेली होती. त्यात बहुतांश नावे ही मुस्लीम मतदारांची दिसून येत आहे. मिळून आलेली कार्डे ही फेक आहेत की, ओरिजनल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फेक आहे तर ती कोणी बनविली. त्याचे हे कृत्य उघड होण्याच्या बेतात असल्याने त्याने ती जाळली असावी.
मुस्लिम मतदारांची कार्डे जास्त असतील तर मुस्लिम विरोधी पक्षाकडून त्यांना मतदान मिळणार नाही म्हणून त्यांची कार्डे नष्ट करण्याचा हा प्रताप असावा. खरी वोटर कार्डे जाळून मतदारांच्या हक्कावर गदा आणणे. त्या प्रभागातील मते कमी करणे. जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येऊ नये या विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आता खरी कसोटी पोलिसांची आहे. लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी मतदान आवश्यक आहे. मतदानासाठी व्होटर कार्ड आवश्यक आहे. तेच नसेल तर लोकशाहीचा हक्क कसा बजाविणार असा प्रश्न आहे. त्यासाठी या प्रकरणाचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे व्होटर कार्डे तयार करणारी यंत्रणाही संशयाच्या भोव-यात आली आहे.