धक्कादायक! ठाणे शहर आयुक्तालयातील ५५ पोलिसांना व्हावे लागले कॉरंटाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 09:09 PM2020-04-15T21:09:54+5:302020-04-15T21:14:20+5:30
एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील अनेक नागरिकांवर कॉरंटाइन होण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील गर्दी कमी करणे, मुंब्य्रासारख्या हॉटस्पॉट भागात गस्त घालणे आणि कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे मुंब्रा, वर्तकनगर आणि ठाणेनगर येथील ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे या पोलीस ठाण्यातील आणखी चौघांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामधील विलगीकरणातील पोलीस कर्मचाºयांची संख्या ही ५५ झाली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे या पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचा-यांना विलगीकरणात ठेवले होते. त्यातील आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने २९ कर्मचारी हे विलगीकरणात आहेत. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे २२ कर्मचारी हे दोन कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कात आल्यामुळे त्यातील १४ जणांना विलगीकरण केंद्रात तर आठ जणांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. खबरदादारीची उपाययोजना म्हणून या २२ कर्मचा-यांसह आणि १८ अशा ४० कर्मचाºयांची मंगळवारी कोरोनाची तपासणी केली आहे. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन करणा-यांवरील कारवाई करतांनाच स्वत:चीही काळजी घ्या, खबरदारीच्या उपाययोजना करा, असा सल्लाही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी आपल्या कर्मचा-यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.