धक्कादायक! बलात्कार पीडित तरुणीने आत्महत्येसाठी ऑनलाईन मागवलं विषारी औषध
By पंकज पाटील | Published: September 28, 2022 06:21 PM2022-09-28T18:21:16+5:302022-09-28T18:23:09+5:30
विशेष म्हणजे हे विषारी औषध संबंधित तरुणीला ऑनलाईन उपलब्ध झाले. हेच विषारी औषध घेऊन संबंधित पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला.
बदलापूर : बदलापुरात राहणाऱ्या एका तरुणीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एका माजी नगरसेवकाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीने बलात्काराच्या घटनेनंतर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे हे विषारी औषध संबंधित तरुणीने गुगलवर सर्च करून ऑनलाईन पद्धतीने मागविले होते. ऑनलाइन विषारी औषध उपलब्ध झाल्याने पोलीसदेखील चक्रावले आहेत.
शिवसेनेच्या माजी नगरसेविकाचा मुलगा महेंद्र भोईर याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बदलापूरच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तयेच या घटनेनंतर, संबंधित आरोपी हा तरुणीला लग्नासंदर्भात कोणताही प्रतिसाद देत नव्हता. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी संबंधित तरुणीने गुगलवर विषारी औषध सर्च करून ते ऑनलाईन पद्धतीने मागविले होते.
विशेष म्हणजे हे विषारी औषध संबंधित तरुणीला ऑनलाईन उपलब्ध देखील झाले. हेच विषारी औषध घेऊन संबंधित पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर योग्य वेळी उपचार झाल्याने तिचा जीव वाचला असला तरी हे विषारी औषध ऑनलाईन कसे उपलब्ध झाले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
ऑनलाइन खरेदीच्या व्यवहार वाढत असताना आता विषारी औषधदेखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्याने पोलीसदेखील चक्रावले आहेत. दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीने विषारी औषधांची विक्री होऊ नये या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील आरोपी महेंद्र भोईर याला अद्यापही अटक करण्यात आलेले नाही. तर हे प्रकरण परस्पर मिटवण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याची बाब समोर येत आहे. मात्र यासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती पोलीस प्रशासन देत नाही.