धक्कादायक! कॅन्सरवरील औषध मिळविण्याच्या नावाखाली अमेरिकन महिलेने केली २२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 01:28 AM2020-07-15T01:28:56+5:302020-07-15T01:35:42+5:30
इन्स्टाग्रामवर एका अमेरिकन महिलेशी मैत्री करणे ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील ५२ वर्षीय उच्च पदस्थ अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. ब्रिस्ट कॅन्सर या आजारावरील बिया भारतातून पाठविण्याच्या नावाखाली त्याची तब्बल या महिलेने २२ लाख ७८ हजारांची आॅनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी या महिलेसह पाच जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उत्सुकतेपोटी इन्स्टाग्रामवर एका अमेरिकन महिलेशी मैत्री करणे ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील ५२ वर्षीय रहिवाशाला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने स्तनाचा कर्करोग (ब्रिस्ट कॅन्सर ) या आजारावरील बिया भारतातून पाठविण्याच्या नावाखाली त्याची तब्बल २२ लाख ७८ हजारांची आॅनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी या महिलेसह पाच जणांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाण्यातील माजिवाडा भागातील एका नामांकित गृहसंकुलामध्ये दीपक शर्मा (नावात बदल) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. एका मोठ्या खासगी कंपनीमध्ये ते उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांची इन्स्टाग्राम या सोशल साईटवर १४ मे २०२० रोजी लॉरा डॉरा नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. पुढे तिने तिचा व्हॉटसअॅप क्रमांकही त्यांना दिला. आपण अमेरिकेत वास्तव्याला असून एका खाजगी कंपनीत सेक्र ेटरीपदावर नोकरी करीत असल्याची तिने शर्मा यांना बतावणी केली.
अमेरिकेतील एक औषध कंपनी ब्रिस्ट कँन्सर या आजारावर औषध तयार करते. त्या औषधासाठी लागणाºया बिया (सिड्स) या भारतात खूप अल्प दरामध्ये उपलब्ध होतात. अमेरिकेत त्यांची किंमत जास्त आहे. आपली एक नातेवाईक महिला एका फार्मसी कंपनीमध्ये नोकरीला असून ती या बिया तुमच्याकडून खरेदी करील. त्यातून आपल्या दोघांनाही मोठा फायदा होऊ शकतो, अशीही तिने त्यांना बतावणी केली. त्यानंतर तिने त्यांना दिल्लीतील एका दलालाचा मोबाइल क्र मांक दिला. हा दलाल तुम्हाला बियांचे सॅम्पल पाठवेल ते सॅम्पल अमेरिकेच्या दलालाकडे पाठवा, असेही तिने त्यांना बजावले.
आपल्याला चांगला फायदा होईल या भाबडया आशेपोटी शर्मा यांनी या दलालाच्या मोबाईलवर संपर्क करुन बियांचे सॅम्पल मागविले. तीन सॅम्पलची किंमत दोन लाख २५ हजार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आधी आॅनलाईन पेमेंट करा, मगच बिया तुम्हाला अगदी घरपोच मिळतील, असेही सांगण्यात आले. नंतर शर्मा यांनी या दलालाने दिलेल्या बँक खात्यावर सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम आॅनलाईन पाठविली. मात्र, बरेच दिवस उलटूनही बियांचे सॅम्पल आले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता, संबंधित कंपनीला तीन नव्हे तर दहा पाकिटांची गरज असल्यांचे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना वेगवेगळे बँक खाते क्र मांक देऊन पेमेंट करण्यास सांगण्यात आले. मोठी आॅर्डरमुळे शर्मा यांनी वेगवेगळ्या खात्यांवर २२ लाख ७८ हजार रु पये आॅनलाईन जमा केले. मात्र, बियांची डिलिव्हरी त्यांच्या घरापर्यंत पोहचलीच नाही. त्यानंतर लारा डोरा हिच्यासह सर्वांचे फोन बंद झाले होते.