धक्कादायक! वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून ठाण्यात मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:46 PM2020-01-20T22:46:17+5:302020-01-20T22:53:06+5:30
दारुसाठी कुटूंबीयांकडून पैसे मिळत नाहीत. तसेच मारहाणीची तक्रारही वडिलांनी पोलीस ठाण्यात केली. याच रागातून सागर सुर्वे (३१) याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १२ जानेवारी रोजी रात्री घडली. सुदैवाने त्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मद्यपी मुलाने मारहाण केल्याची तक्रार विजय बाबुराव सुर्वे (५०) यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सागर सुर्वे (३१) याच्याविरुद्ध दिली होती. याच रागातून सागर याने दारुच्या नशेतच राहात्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री घडली. त्याला बोलण्यात गुंतवून स्थानिक रहिवाशी आणि
व्यसन असल्यामुळे सागर हा त्याचे वडील आणि पत्नीकडे नेहमीच दारूसाठी पैशांची मागणी करीत होता. पैसे न दिल्याने तो त्यांना शिवीगाळ आणि मारहाणही करीत होता. १८ जानेवारी रोजीही दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने वडिलांना मारहाण केली होती. नेहमीच्या त्रासाला कंटाळून विजय यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदविली होती. १९ जानेवारी रोजीही अशाच भांडणातून त्याने स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार केले. या नंतर त्याने वास्तव्याला असलेल्या वागळे इस्टेट रामचंद्र नगर येथील तन्मय सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी त्याला बोलण्यात गुंतविले. नंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासात त्याची सुटका केली. त्याने यापूर्वीही दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण आणि उपनिरीक्षक फड यांनी त्याचे समुपदेशन करून अशा प्रकारे आत्महत्या करण्यापासून त्याला रोखल्याची माहिती सूत्रांनी दिली.