धक्कादायक! उधारीच्या २० हजारांसाठी भिवंडीत तरुणाचा खून: आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:12 PM2020-04-20T22:12:23+5:302020-04-20T22:15:05+5:30
केवळ उसनवारीवर घेतलेल्या २० हजारांसाठी सोहेल पठाण या १८ वर्षीय तरुणाची भिवंडीतील पोगाव गावात रविवारी हत्या झाली होती. या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांमध्ये छडा लावून ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खूनी शाहबाज अन्सारी (२१) याला रविवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दिड महिन्यांपूर्वी उसनवारीवर घेतलेले पैसे वारंवार तगादा लावूनही परत न केल्याच्या रागातून सोहेल पठाण (१८, रा. पोगाव, भिवंडी) याचा चाकूने वार करुन खून करणाऱ्या शाहबाज अन्सारी (२१, रा. शांतीनगर, आझादनगर, भिवंडी) याला अवघ्या १२ तासांमध्येच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली आहे. त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एकीकडे कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. याच संचारबंदीच्या बंदोबस्तामध्ये पोलीस व्यस्त असतांनाच ठाणे ग्रामीणमधील भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोगाव गावाच्या परिसरात तानसा धरणामधून मुंबईकडे जाणाºया जलवाहिनी लगत शस्त्राने गंभीर जखमा झालेल्या अवस्थेतील अनोळखीचा मृतदेह पोलिसांना १९ एप्रिल रोजी मिळाला. एकीकडे कोरोनामुळे अनेक मजूर हे रस्त्यावरुन स्थलांतराच्या प्रयत्नात या खूनामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राम भालसिंग यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार या तपासासाठी तीन पथकांची नियुक्ती केली होती. एकीकडे सीसीटीव्हीच्या आधारे तसेच फोटोच्या आधारावर शांतीनगर,निजामपूरा, भिवंडी शहर या भागातील लोकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असतांनाच भिवंडीतील रहमतपुरा भागातील रहिवाशी लालाखान पठाण यांचा मुलगा सोहेलचा तो मृतदेह असून त्याला नशा करण्याचीही सवय होती, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार त्याच्या वडिलांनीही मुलाचा मृतदेह ओळखला. सोहेलची पैशाच्या देवाणघेवाणीतून शाहबाज अन्सारी याच्याबरोबर बाचाबाची झाल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्याच परिसरातून अवघ्या १२ तासांमध्येच शाहबाजलाही आंधळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. सोहेलने दीड महिन्यांपूर्वी घेतलेले २० हजार रुपये देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. शिवाय, पैसे देण्याऐवजी त्याने शिवीगाळही केली. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन अन्सारीने सोहेल याला भेटण्यासाठी बोलावून तानसा मुंबई जलवाहिनीच्या जवळच सोहेलच्या पोटावर, डोक्यात आणि गळयावर सपासप वार करुन खून केल्याची कबूली अन्सारीने पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रविण हाबळे, महादेव खोमणे, सुनिल कदम, पोलीस नाईक हनुमान गायकर, अमोल कदम, उमेश ठाकरे, सतीश कोळी, सुहास सोनावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी राय आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. गुन्हयाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग हे करीत आहेत.