धक्कादायक! घोडबंदर रोडवर ज्वलनशील अॅसिडचा कंटेनर उलटला: सुदैवाने जिवित हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:31 PM2020-04-20T22:31:43+5:302020-04-20T22:34:58+5:30
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर न्हावाशेवा बंदरातून तारापुर औद्योगिक वसाहतीमध्ये ज्वलनशील अॅसीड भरलेले ड्रम वाहून नेणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या कंटेनरमधील अॅसिड रस्त्यावर सांडल होते. रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे रस्ते मोकळेच असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहनेही आता भन्नाट वेगाने जात आहेत. यातूनच ठाण्याच्या घोडबंदर रोडवर न्हावाशेवा बंदरातून तारापुर औद्योगिक वसाहतीमध्ये ज्वलनशील अॅसीड भरलेले ड्रम वाहून नेणाºया कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या कंटेनरमधील अॅसिड रस्त्यावर सांडल होते. रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळच नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातामध्ये कंटेनरचा चालक शमजीत यादव याला कोणतीही दुखापत न होता तो यातून बचावला आहे.
घोडबंदर रोडवरील गायमुख रेतीबंदरजवळ न्हावाशेवा बंदरातून तारापूर एमआयडीसीतील आरती इंडस्ट्रीजकडे निघालेल्या या कंटेनरवरील चालकाचे १९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण सुटले. त्यातच तो पलटी झाला. या कंटेनरमध्ये अमिनो अॅसेटिक अॅसिडने भरलेले मोठे 18 ड्रम होते. कंटेनर पलटी झाल्यानंतर ड्रम फुटून अॅसिड रस्त्यावर सांडले. वाहतूकीची वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. कंटेनर चालक यादव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.