धक्कादायक! कर्ज काढून देण्याच्या नावाखाली मुलीनेच केली पित्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 08:51 PM2019-02-08T20:51:39+5:302019-02-08T21:08:08+5:30
घर दुरुस्तीसाठी कर्ज काढू, अशी बतावणी वडीलांकडे करुन त्याच नावाखाली काही कागदपत्रांवर सहया घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे राहते घर स्वत:च्या नावावर केल्याप्रकरणी वैजयंती चांदमारे या मुलीविरुद्ध वडील द्रोपती मगरे यांनी फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
ठाणे: कर्ज काढून देण्याच्या नावाखाली वैजयंती चांदमारे या स्वत:च्या मुलीनेच बनवट कागदपत्रे तयार करुन अंबिकानगर, वागळे इस्टेट येथील राहते घर तिच्या नावावर करुन फसवणूक केल्याची तक्रार द्रोपती मगरे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट, अंबिकानगनर येथील महात्मा फुले चाळीत मगरे यांच्या मालकीचे १५ बाय १५ चौरस फुटाचे घर आहे. त्यांची मुलगी वैजयंती हिच्या पतीचे निधन झाल्यापासून ती तिच्या मुलीसह वडील द्रोपती मगरे यांच्याकडेच वास्तव्याला आहे. असे असूनही तिने दोन वर्षांपूर्वी घर दुरुस्तीसाठी कर्ज काढू, अशी बतावणी वडीलांकडे केली. त्याच नावाखाली तिने काही कागदपत्रांवर वडीलांच्या जबरदस्तीने सहया देखिल घेतल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे राहते घर हे तिच्या नावावर केले. हा प्रकार मगरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी मुलीच्या विरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक एस. बी. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.