धक्कादायक! नाकाबंदीतही ठाण्यात भरघाव खासगी बसने पोलिसाला उडविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:06 PM2021-02-02T21:06:12+5:302021-02-02T21:08:48+5:30
नाकाबंदी असूनही भरघाव वेगाने आलेल्या एका खासगी आराम बसने कळवा खाडी पूल येथे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गोविंद बुळे (५२) यांना धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातानंतर या बसवरील चालक अंकुश याला ठाणेनगर पोलिसांनी दुपारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: नाकाबंदी असूनही भरघाव वेगाने आलेल्या एका खासगी आराम बसने कळवा खाडी पूल येथे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गोविंद बुळे (५२) यांना धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बस चालक अंकुश मत्रे (२९) यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळवा खाडी पूलाजवळ ठाणे शहर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यासाठी बॅरिकेटसही लावण्यात आले होते. १ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास कळवा ते ठाण्याच्या कोर्ट नाक्याकडे ही खासगी आराम बस येत होती. त्यावेळी चालक अंकुश याने भरघाव वेगात आणि बेदरकारपणे ती चालवून नाकाबंदीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक गोविंद बुळे यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या कमरेच्या हाडाला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर या बसवरील चालक अंकुश याला ठाणेनगर पोलिसांनी दुपारी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.